Wednesday, May 15, 2019

या भारतात बंधुभाव

या भारतात बंधुभाव....

तुकडोजी महाराज 

 या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
 हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे

 नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
 मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
 स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
 दे वरचि असा दे

 सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
 हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना
 उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे
 दे वरचि असा दे

 जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
 अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
 खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे
 दे वरचि असा दे

 सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी
 ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी
 तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे
 दे वरचि असा दे 


हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी येथे  क्लिक करा  CLICK ME




हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी येथे  क्लिक करा CLICK ME





कवी परिचय :



संत तुकडोजी महाराज   (1909-1980)  यांचे खरे नाव माणिक बंडोजी ठाकूर. लहानपणीच भजन, कीर्तन, भक्ती, नीती यांचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. श्री अडकुजी महाराज हे त्यांचे गुरु होय. अभंगात कीर्तनात ते खंजिरी वाद्याचा वापर करीत असत. त्यांचा आवाजही मधुर होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. पुढे 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेऊन तुरुंगवास पत्करला होता. जाती निर्मूलन, भूदान चळवळ या सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. त्यांनी ‘ग्रामगीता’, अनुभवसागर, समाज संजीवनी,लहरकी बरखा अशा मराठी व हिंदी ग्रंथरचना केल्या आहेत. त्यांचे भजन कीर्तन ऐकण्यास सर्व जाती धर्माचे लोक येत असत. त्यातूनच ते समाज प्रबोधनही करीत असत. म्हणूनच त्यांना ‘राष्ट्रसंत’ म्हटले जाते.
वरील कविता त्यांच्या ‘समाज संजीवनी’ या संग्रहातून निवडली आहे. भारतात एकता नांदावी. सर्वधर्म समभाव रहावा व अस्पृश्यता नष्ट होऊन सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे अशी तळमळ त्यांनी या कवितेत व्यक्त केली आहे. या कवितेचा प्रकार ‘देशभक्तीपर’ हा आहे.

मूल्य :  देशभक्ती
साहित्य प्रकार :  देशभक्तीपर
संदर्भ ग्रंथ :  समाज संजीवनी




प्र. १:   योग्य पर्याय निवडून  लिहा.

१) या भारतात बंधुभाव या कवितेचा प्रकार ---- आहे.
अ) पोवाडा ब) देशभक्तीपर क) भक्तिगीत ड) भावगीत    

२) तुकडोजी महाराजांना --- म्हणून संबोधले जाते?अ) समाजसुधारक ब) देवभक्त क) राष्ट्रसंत  ड) महर्षि    

३) समाजसंजीवनी या ग्रंथाचे कवी कोण?
अ) संततुकडोजी  ब) कबीर क) गजानन महाराज ड) म. फुले   

४)  संत तुकडोजी कीर्तनात --- या वाद्याचा वापर करीत.अ) दिमडी ब) हार्मोनियम क) दगड ड) खंजिरी  

उत्तर : १) ब - देशभक्तीपर, २) क - राष्ट्रसंत, ३) अ - संततुकडोजी, ४) ड – खंजिरी  

प्र . २ : एका वाक्यात उत्तरे द्या. 

1) सर्वस्थळी कोणती पार्थना व्हावी? 
उत्तर : सर्वस्थळी मानवता व राष्ट्रभावनेची पार्थना व्हावी.

2) उद्योगी तरुण कसा असावा? 
उत्तर : उद्योगी तरुण शीलवान असावा.

3) सत्य न्याय कुठे वसावा असे कवीला वाटते? 
उत्तर : वाईट वृत्तीच्या लोकांच्या मनात सत्य-न्याय वसावा असे कवीला वाटते.

४) संप्रदाय कसे दिसावेत?  
उत्तर : सर्व संप्रदाय  एक दिसावेत.

५) अमीर गरीबांनी कसे रहावे? 
उत्तर : अमीर गरीब सुखाने रहावे.

६) उद्योगी तरुण कसा असावा? 
उत्तर : उद्योगी तरुण शीलवान असावा.

|७) अस्पृशता जगातून कशाप्रकारे नष्ट व्हावी?
उत्तर : अस्पृशता जगातून मुळापासून नष्ट व्हावी.

८) सौंदर्याने कुठे रमावे? 
उत्तर : सौंदर्याने घरात रमले पाहिजे.

प्र. ३ : रिकाम्या जागी योग्य  शब्द भरा.

१)  हे सर्व पंथ ---- एक दिसू दे ।

२)  नांदोत सुखे ----- एक मतानी.

३) --- या सकलामाजी वसू दे

४) --- रमो घराघरात स्वर्गीयापरी

५) ---- सदा या सेवेमाजी वसूदे

उत्तरे    १) संप्रदाय २) अमीर गरीब, ३) स्वातंत्र्य सुखा ४) सौंदर्य ५) तुकड्यास.

प्र. ४ : तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.   

1)  मानवता राष्ट्रभावना सगळ्यास कळल्यास काय होईल?
उत्तर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देशात मानवता व राष्ट्रभावना रुजावी अशी परमेश्वराकडे विनवणी करतात. मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे जर लोकांना समजले तर वेगवेगळा धर्म मानण्याची गरज भासणार नाही व धर्मामुळे निर्माण होणाया समस्याही सुटतील. राष्ट्रभावना जर का कळाली तर देशावर पेम निर्माण होईल. कुणीही देशविघातक कृत्यात गुंतणार नाही.

 २) देशात बंधुभाव रहावा विषयी कवी काय म्हणतात? 
उत्तर : या देशात बंधुभाव रहावा म्हणून सर्व धार्मिक संप्रदायांनी एक झाले पाहिजे. कोणामध्येही मतभेद नसावेत. सर्वधर्म समभाव असावा. एकमेकांना साहचर्याने राहिले पाहिजे.

३)  उद्योगी तरुण कसा असला पाहिजे? का? 
उत्तर : उद्योगी तरुण हा शीलवान असला पाहिजे. कारण देशाला जर पगतीपथावर न्यायचे असेल तर तरुणांमध्ये विद्येबरोबर चारित्र्यही हवे. त्यामुळे तो राष्ट्राशी एकनिष्ठेने वागेल. आपल्या देशाचे भवितव्य हे तरुणांच्या हाती असल्याने देशासाठी काहीतरी करणं हे कर्तव्य अंगी जोपासलं पाहिजे.

४) खलनिंदकाच्या मनी सत्य न्याय का वसावा? 
उत्तर : दृष्ट निंदक माणसे समाजाचा नाश करणारी असतात. म्हणून त्यांच्या मनात सत्य न्याय राहिला तर जगात वाईट घडणार नाही म्हणून त्यांच्या मनात सत्य राहू दे असे वाटते.


प्र. ५ : सात-आठ वाक्यात उत्तरे द्या. 

1) भारत कशाप्र कारे  असावा अशी संत तुकडोजीनी अपेक्षा केली आहे? 
उत्तर : ‘‘या भारतात बंधूभाव या कवितेतून आधुनिक नव्या विचारसरणीच्या भारताची अपेक्षा संत तुकडोजी महाराज करतात. भारतात एकता नांदावी. सर्वधर्म समभाव राहावा. गरीब श्रीमंत सर्वजण सुखाने नांदावेत, सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वातंत्र्यसुख अनुभवता येऊ दे, सर्वांना राष्ट्र भावना मानवता यासारख्या गोष्टी कळू दे, पत्येक तरुण हा उद्योगी व शीलवान व्हावा, जातीभेद नष्ट व्हावा, जे दुष्ट वृत्तीचे लोक आहेत. त्यांच्याही मनात सत्याची भावना निर्मा व्हावी, पत्येक घरात स्वर्गसुख निर्माण होऊ दे. अशी अपेक्षा संत तुकडोजीनी केली आहे.

२)  मानवता राष्ट्रभावना सगळ्यास कळल्यास काय होईल? 
उत्तर : संत तुकडोजी महाराजांच्या या भारतात बंधूभाव या कवितेत ते म्हणतात, देशात मानवता हा श्रेष्ठ धर्म आहे. हे सर्वांना समजले तर लोकांना वेगवेगळ्या धर्माची गरज लागणार नाही. आपल्या देशावर प्रेम करायचे कळले तर देशावर सर्वांचे प्रेम जागृत होईल. 

प्र. ६ : संदर्भासह स्पष्टीकरण करा. 

१) हो सर्वस्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना. 
उत्तर : वरील ओळ संत तुकडोजी महाराजांच्या या भारतात बंधुभाव या कवितेतील असून संत तुकडोजी महाराज देशात सर्वांचा एक धर्म असावा आणि त्यामुळे सर्वांनी प्रार्थनाही एकच तीही समुदायाने करावी. ही इच्छा व्यक्त केली आहे. असाच देवाकडे वर मागितला आहे



कवितेचा सारांश : 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही प्रसिद्ध अशी कविता आहे. यामध्ये  त्यांनी  भारतात सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे., सर्वांनी मिळून मिसळून रहावे ही तुकडोजींची तळमळ आहे ते म्हणतात. या भारतातील लोकांमध्ये बंधूभाव राहू दे. हे देवा असाच वर मला दे. सर्वपंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. गरीब श्रीमंत एकमताने राहू देत हिंदू मुस्लीम ख्रिश्चन कोणीही असू देत सर्व सुखाने नांदावेत! सगळ्यांना माणुसकी समजु दे. सगळ्यांना राष्ट्राविषयी प्रेम समजू दे. आपापल्या प्रार्थनास्थळात सामुदायिक प्रार्थना होऊ दे. या भारतातील तरुण उद्योगी असू दे आणि तो चारित्र्यसंपन्न असावा असाच वर दे. आम्ही सर्व मिळून जातीभेद विसरून एक होऊन व या जगातूनच अस्पृश्यता नष्ट करू. दृष्ट निंदक वाईट लोक यांच्यामध्ये सत्य न्याय असावा असा वर दे देवा. स्वर्गसमान सुंदरता सुख प्रत्येक घराघरात नांदू दे. जगातील सर्व प्रकारची भिती संकट नष्ट व्हावे. असा वर दे देवा आणि या तुकड्यास तुझ्या सेवेसाठी नियमित असावे असाच वर दे. स्वत:साठी देवाकडे ऐष आराम संपत्ती न मागता देशासाठी मागत आहेत. हेच खरे राष्ट्रसंत.




----------------------------------------------------------------------------------------------------------------


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  

तुकडोजी महाराज 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे
जन्म एप्रिल 30, १९०९
 यावली, जि. अमरावती
निर्वाण ऑक्टोबर ३१, १९६८

गुरू आडकोजी महाराज
भाषा मराठी, हिंदी
साहित्यरचना ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली
कार्य अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन
वडील बंडोजी
आई मंजुळाबाई



तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

 



गाडगे बाबासमवेत 
 









भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती. त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले.

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.

सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.

महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.

देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून केला.

ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.

तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळा द्वारे केले जाते.

ग्रामगीताहा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करुन दिला आहे.

00000000000000000000000000000000000000000000 
तुकडोजी महाराजांना 'राष्ट्रसंत' का म्हणतात असा प्रश्न अनेकजण विचारात असतात. देव फक्त मंदिर, मस्जिद किंवा चर्चमध्ये नाही तर तो 'चरा-चरात' आहे, सर्वत्र आहे. तरीही आमचा परिसर अस्वच्छ का, आमचा गाव दु:खी का ? याचं कारण दडलंय देव आणि धर्म याविषयीच्या आमच्या अज्ञानात. एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडणे, त्यायोगे गावाच्या - समाजाच्या व एकूणच देशाच्या विकासासाठी हातभार लावणे यापेक्षा मोठी ईश्वरभक्ती ती काय ? आणि याच मानवसेवेच्या मार्गदर्शक तत्वांचे काव्यमय रूप म्हणजेच तुकडोजी महाराजांनी रचलेली 'ग्रामगीता'. जपान्यांच्या शिस्तीचे किंवा चीनी जनतेच्या उद्यमशीलतेचे कौतुक करत इतर देशांकडे आपल्या जखमांवर औषध शोधण्यापेक्षा या ग्रंथाकडे भारतीयांनी योग्य गांभीर्याने बंधने आवश्यक आहे.

00000000000000000000000000

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024