Sunday, August 8, 2021

कल्पनाविस्तार

 

कल्पनाविस्तार

 

कल्पना विस्तार करणे म्हणजे दिलेल्या विषयावर लहानसा निबंधच लिहून दाखविणे होय. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक ठरते.

1.  कल्पना विस्ताराला जास्तीत जास्त तीन परिच्छेदांची मर्यादा असावी.

2. प्रास्ताविक, मध्य आणि शेवट असे ह्या परिच्छेदांचे स्वरूप असावेŸ.

3. दिलेला जो विषय असेल त्याचा सुबोध असा स्पष्टार्थ प्रथम सांगावा.

4.  कल्पनेचा विस्तार करताना समर्पक गोष्टींचे सारांश, प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणे अवश्य द्यावीत.

5. कल्पना विस्तारासाठी दिलेले वााक्य कोणी अन् कोणत्या प्रसंगी उद्गारलेले आहे हे निश्चित माहीत असल्यास त्याचाही उल्लेख करावा.

6. शक्य असल्यास त्याच अर्थाची इतर सुभाषिते, म्हणजी यांचा वापर जरूर करावा.

7. मूळ दिलेल्या विचाराच्या अगर कल्पनेच्या बरोबर विरुद्ध असाही एखादा विचार असण्याची शक्यता आहेच. त्याचा फक्त उल्लेख तेवढाच करावा.

8. हे सर्व लेखन माहितीचा आराखडा होऊ नये, वाङ्मयीन गुणांनीही ते समृद्ध असले पाहिजे.

 

ग्रंथ माझा गुरु

          गुरुशिवाय ज्ञान नाही अन् मोक्षही नाही. यास्तव ‘गुुरुब्रह्म, गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वर:’ अशी शास्त्रात त्याची महत्ती गायिली आहे.

          गुरुकडून विद्या प्राप्त करून घेण्यासाठी चिकाटी हवी. प्राचीन काळी गुरुसेवा, गुरुदक्षिणा द्यावी लागत असे आज त्याबद्दल जबर मूल्य द्यावे लागते.पैसे मोजावे लागतात.

          वरील त्रासाशिवाय ज्ञान देणारे गुरु ग्रंथशासन वा उपहास करीत नाही. त्यांची लहर सांभाळावी लागत नाही. आपल्या लहरीप्रमाणे हे ज्ञान घेता येते. ज्ञानदानात काळाची अन् स्थळाची बंधने नाहीत.

आजच्या जगात ग्रंथसंपत्ती विपुल पण त्यातून निवडीचे कौशल्य आवश्यक, अमोल अन बहुमोल ज्ञानभांडार देण्यास ग्रंथ सदैव उत्सुक.

म्हणी अनुभवाच्या खाणी

          अनुभव ही शहाणपणाची जननी आहे. या जगात यशस्वीरित्या जगावयाचे असेल तर व्यवहारी शहाणपणाची आवश्यकता असते.

           मानवी जीवन हे अपूर्ण, अधुरे अन् क्षणभंगुर आहे.

          काही अनुभव आस्वादता येणे हेच शक्य.

          विचित्र अन विभिन्न अनुभव घ्यावयाचे म्हटले तर जीवन पुरे पडणार नाही. तसे घेताही येणार नाहीत.

          म्हणी आपणास अनुभव देतात. ते अनुभव अनमोल अन् बहुमोल असे. अति तेथे माती ही म्हण. गरीब भिकारी राजा प्रसन्न पण भिकाèयाची हाव खूप. शेवटी सर्व सोन्याचा नाश. हा अनुभव आपणास फुकट मिळतो. त्यासाठी आपले वैयक्तिक नुकसान होत नाही.

          पण म्हणी या अर्धसत्यात्मक, संपूर्ण आचरणात आणता येणार नाहीत. कारण अनुभव कोरलेल्या एखाद्या म्हणीला नेमका छेद देणारी दुसरी म्हण सापडते. म्हणून म्हणीतील अनुभव पारखून समतोलपणे आचरणात आणला तरच त्या अनुभवाच्या उपयुक्त खाणी ठरतील.

जखम साहवे शस्त्राची, नच शब्दाची

  शस्त्राची जखम शरीराला होते. कालांतराने ती बुजते. जरी तिचा व्रण राहिला तरी शब्दांची जखम मनाला होते. आपले अंत:करण भेदून ती जाते.

          शब्दाच्या तलवारीला जणू जहर लावलेले असते. गडकèयांच्या पुण्य प्रभाव नाटकातील वसुंधरेच्या तोंडचे ‘‘वृंदावनाना कमी दर्जाच्या कुलातले  म्हणून नाही म्हटलं’’ हे वाक्य असेच आहे. या शब्दांनी वृंदावनाला खलनायक बनविले. ही शब्दाची जखम तो सहन करू शकला नाही.

          शस्त्राची जखम या कालचक्रात विसरली जाते. पण स्मृतीचे वरदान अधिक असल्याने मनाला झालेली जखम विसरली जात नाही. कारण माणूस हा संवेदनाक्षम, भावनाशील असल्याने या जखमा सतत भळभळत असतात.

प्रेम, पूजा आणि पावित्र्य म्हणजे परमेश्वर

          परमेश्वर फक्त देवळात असतो ही गोड पण गैर समजूत.

          प्रेम, पूजा आणि पावित्र्य या मानवी मनातील उदात्त अन् उत्स्फूर्त भावना तशाच चिरंतन.

          प्रेमात उदंड सामर्थ्य असते. प्रीती ही भक्तीचीच पहिली पायरी आहे. रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनू यांची प्रीती अशीच भव्योदात्त. विशुद्ध प्रीतीतच परमेश्वराचा साक्षात्कार होतो.

          पण नुसते विशुद्ध प्रेम असूनही परमेश्वराची प्राप्ती ही होत नाही. त्यासाठी पार्वतीसारखी  पूजा हवी. तुकारामासारखे विशुद्ध मन हवे. इतके विशुद्ध की तुकाराम ज्या स्वच्छ अन् शुभ्र संगमरवरी फरशीवरून चालत असे तिचे डाग त्याच्या पायाला पडत - सर्वस्वाचे समर्पण करणे आवश्यक.

प्रेम, पूजा अन् पावित्र्य यांच्या त्रिवेणी संगमातच परमेश्वराचा साक्षात्कार होतो. विशुद्ध प्रेम आणि समर्पित पूजा यांच्या मीलनातून पावित्र्याचा साक्षात्कार होतो. परमेश्वर म्हणजे तरी काय ? जी जी तत्त्वे मानवी जीवनाला चिरंतन सुख, विशुद्ध रूप प्राप्त करून देतात तोच परमेश्वर. खरा परमेश्वर मूर्तीत वा मंदिरात नसतोच.

नरेची केला हीन किती नर !

          माणसानेच माणसाची अप्रतिष्ठा करून ठेवली आहे. असा या ओळीचा अर्थ आहे. हा विचार अगदी सत्य आहे. ‘मानसा मानसा कधी व्हशील मानूस’ असा प्रश्न बहिणाबाई चौधरी विचारतात त्याचा आशयही हाच आहे.

          वास्तविक सर्व प्राणिमात्रात मनुष्यप्राणी हा अधिक श्रेष्ठ. त्याला बरेवाईट कळते. हित-अहित तो जाणतो. चांगले-वाईट यातील अंतर त्याला समजते. काल, आज, उद्या यांचा विचार तो करू शकतो. इतिहास, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, विविध कला, शास्त्रे अशा कितीतरी गोष्टी त्यांनेच निर्माण केल्या आहेत.

          पण याच माणसाच्या ठिकाणी स्वार्थ नावाचा भयंकर दुर्गुण आहे. द्वेष, मत्सर, आप्पलपोटेपणा, दुसèयावर अन्याय करण्याची तयारी अशा अनेक दुष्ट प्रवृत्तीही आहे. या दुष्ट प्रवृत्ती बèयाच वेळा त्याच्या चांगुलपणावर मात करतात.

          जग भेदभावांनी भरलेले आहे. याचे पावलोपावली प्रत्यंतर येते. परमेश्वरांने केलेली निर्मिती नि:पक्षपाती स्वरूपाची, आनंद स्वरूपी अखिल मानवाने आस्वादाची या हेतूने केलेली पण.... मानवानेच त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ हे भेदभाव निर्माण केले. स्वार्थ, अशुभता, वासना, काम इ. मुळे त्या सृष्टीतील सुखात काटे पेरले ते सुख नासवून टाकले.

          तुतारी’ तून केशवसुतांनी यावरच ताशेरे झाडले. अस्पृश्यतेचे उदाहरण. समाजातील स्वार्थी लोकांचीच ही कारवाई आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांची झालेली वंचना याच स्वरूपाची. हा श्रेष्ठ. त्याला सर्व गुन्हे माफ. या समजुतीतूनच स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा पडल्या होत्या.

          स्त्रिया आणि अस्पृश्य यांना ज्ञानवंचित केले. आज काळ पालटला आहे. त्यांना संधी देणे हाच आजच्या युगाचा गुरुमंत्र.

          परमेश्वराच्या या आनंदमयी सृष्टीत सगळ्यात स्वार्थी फक्त मानव. अनेक दुर्गुण त्याच्या ठिकाणी. त्यामुळे एखाद्याचा विकास दुसèयाला असह्य होऊन त्याला खाली ओढले जाते आणि एका मानवाने दुसèयाला रसातळास पोहोचविलेले दिसते. इतर सृष्टीत हे क्वचितच दिसेल.

सुसंगती सदा घडो

हे मोरोपंताचे वचन. परमेश्वरापेक्षा सज्जनाच्या संगतीचा महिमा मोठा. कोणत्याही अपरिचिताची माहिती जमविताना त्याचा मित्रपरिवार आपण लक्षात घेतो.

          आंग्ल भाषेतही याच अर्थाचे वचन आहे. ए मॅन इज नोन बाय दि कंपनी ही कीपस.

          जीवनात संगतीचे अत्यंत महत्त्व. जसा सहवास तसा मानव Ÿ। सात गुणांचा आढळ Ÿ।।

          कोवळ्या संस्कारक्षम वयात याचा प्रभाव जास्त जाणवतो.

          महात्माजींचे उदाहरण. वाईट संगतीने चोरी केली. अभक्ष्य भक्षण केले. नामदेव प्रथम दरोडेखोर. संतसहवासाने साधु बनला.

          तुकारामाचेही मत असेेच. ‘नलगे मुक्ती धन संपदाŸ। संतसंग देई सदा’

          सज्जनाची संगत म्हणजे परिपूर्ण परमेश्वराची संगत; श्रेष्ठ मूल्यांची संगत; आदर्शाची संगत; अशा संगतीमुळेच माणूस ‘पूर्ण’ बनतो. देवत्वास जाऊ शकतो. तो खèया अर्थाने माणूस बनतो.

 

फुलासंगे मातीस वास लागे

          निसर्गात नित्य पाहावयास मिळणारी ही घटना. एखाद्या वेलीवरची वा झाडावरची सुगंधी फुले मातीत पडली तर त्या मातीलाही त्या फुलांचाच वास येतो. उत्तमाची संगत धरली की कनिष्ठालाही त्या   उत्तमाचा स्पर्श होतो. क्षुल्लक, पायदळी तुडविली जाणारी माती ही फुलांच्या संगतीमुळे  सुगंधित होते.

          परिसाने लोखंडाला स्पर्श केला की त्याचे सोन्यात रूपांतर होते. अमृताने ताकाला जवळ केले तरी अमृताचे ताक होत नाही, ताकाचेच अमृत होते. दगडाचा देव केला की दगडालाच देवपण येते. त्याप्रमाणे माणसाने सदैव सज्जनाच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. थोरामोठ्यांच्या सहवासाने त्यांचे अल्पस्वल्प गुण आपोआपच आपल्या अंगी बाणतात. अभ्यासू मुलांच्या संगतीत एखादा उनाड आणि टवाळ मुलगा गेला की तो सुधारतो. त्यांच्यातील दोष हे आपोआप लयास जातात. अन् गुणवृद्धी होते. वाल्या कोळ्याचा जगन्मान्य वाल्मीकी ऋषी होतो. विद्वानांच्या सान्निध्यात, शूरांच्या सहवासात, संतांच्या निकट राहून आपले समग्र जीवन बदलून गेलेले अनेकांनी अनुभवले आहे. चांगल्या संगतीने सामान्यालाही असामान्यपण प्राप्त होते.

           आपणासारिखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तयालागी’ हे कसब सज्जनांच्या ठायी असते.

स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी

निसर्गात प्रेमाचे अनेक प्रकार पण सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्त असे आईचे प्रेम. ‘कुपुत्रो जायते, क्वचिदपि कुमाता न भवती  हेच खरे.

          एका प्रेमांध माणसाची कथा. प्रेयसीने आईच्या काळजाची मागणी केली. आईचे काळीज घेऊन तो सत्वर धावला. रस्त्यात अडखळून पडला ते काळीज गलबलून म्हणाले, ‘‘बाळ, लागलं नाही ना फारसं ?’’ असे या प्रेमाचे उदात्त स्वरूप.

          पती-पत्नी, बंधु-भगिनी यांच्या प्रेमाला अनेक कारणे आहेत. पण ‘कार्यकारण’ या नियमाला हे प्रेम अपवाद आहे.

          प्रेम-संरक्षण-स्फूर्ती यांचे अधिष्ठान म्हणजे माता. आपल्या कवनाची जनताजनार्दनाची स्तुती केली तरीही ‘आई करावयास तूनाहीस कौतुकाला।। या न्यूनतेमुळे ही। मज त्याज्य पुष्पमाला।। अशी स्थिती न झाली तरच नवल.

          सारी सुखे एकीकडे आणि वात्सल्याने तुडुंब भरलेला साधा मातेचा हस्तस्पर्श दुसरीकडे. या या स्पर्शाची थोरवी आणि तृप्ती अधिक अशी ही आईची थोरवी असताना परमेश्वर मात्र आईविना खरोखर भिकारी बनलेला आहे. अमाप संपत्ती लोळण घेत असतानाही !

असाध्य ते साध्य करिता सायास

          हे संत तुकाराम महाराजांचे वचन. सार्थ आणि समर्पक. आयुष्यातील धडपडीला चिकाटीला त्यामुळेच अर्थ लाभतो.

          तेनसिंगला गौरीशिखरावर चढून जावयाचे होते. अनेक प्रयत्न त्याने केले. बèयाच वेळा अपयश आले. पण अपयश हीच यशाची पायरी आहे. हे वचन त्याने सिद्ध करून दाखविले.

          प्रयत्न केल्यावर शेवटी परमेश्वरप्राप्ती. दीडशे वर्षाची गुलामगिरी याच बळावर आम्ही झुगारून दिली. आपण स्वातंत्र्यदेवतेला प्रसन्न केले.

          नेपोलियनची हीच जिद्द. इम्पॉसिबल इज ए वर्ड इन द डिक्शनरी ऑफ फूल्स. त्याच्या महान यशाचे हेच गमक.

          विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात माणूस चंद्रावर जाऊन परत आला.

          कधी न भेटणारा परमेश्वर भेटतोही अभ्यासाने, प्रयत्नाने. जे जे थोर पुरुष होऊन गेले त्यांच्या जीवनात हे प्रयत्नाचे स्तोत्रच दिसून येते.

प्रेम लाभे प्रेमळाला  त्याग ही त्याची कसोटी

          मानवी जीवनात अन्नपाण्याइतकीच प्रेमाची उब आवश्यक. बालपणी मातेची स्नेहल वत्सलता, तारुण्यातील उद्दाम अन् धुंद प्रेम, वार्धक्यातील मुलांची माया यांनीच मानवी जीवनाला रसरशीतपणा आणि चैतन्य लाभते.

          प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे’ हीच जगाची रीत. ‘प्रीती मिळेल का हो बाजारी ? प्रीती मिळेल का शेजारी’ अशीच वणवण सुरु होते.

          त्यासाठी त्याग आवश्यक. आपल्याजवळ जे जे चांगले आहे ते ते सर्वस्वाने  देणे म्हणजेच प्रेम.

          आई सर्वात प्रिय. कारण निरपेक्ष अशी तिची प्रीती. गांधीजींनी जो थोर त्याग केला त्यामुळेच ‘मानवतेचे पुजारी’ असे जगाने प्रेमोद्गार काढले. आगरकरांचा त्यागही अशाच स्वरूपाचा. तो त्याग पवित्र अन शुद्ध असाच.

          घरातही जो सर्वांसाठी खपतो त्यालाच सर्वजण मानतात. हे प्रेम विशुद्ध अन विमल त्यागानेच लाभते.

अर्थस्य पुरुषो दास:

          मानवाने निसर्गावर विजय मिळविला. माणसांनीच निर्माण केलेले जातीय विषमतेचे काळेकुट्ट अन कावेबाज ढग पांगवले. समतेचे उत्साही अन उल्हासित करणारे चांदणे सगळ्या मानव्यावर पसरवले.

          आज जातीय विषमता नष्ट होत आली असली तरी बेकारीचा भस्मासूर, राव-रंक यांचा संघर्ष यातून आर्थिक विषमता मोठा आधार घेऊ लागली आहे.

          कौरव पांडवांचा गुरु असलेल्या द्रोणाचे हे दीनवाणे वचन द्रौपदीचे वस्त्रहरण डोळे उघडे ठेवून त्याला पहावे लागले. हेतुपुरस्सर तिकडे कानाडोळा करावा लागला. आजही विद्वान, सत्वशील माणसे या मूर्ख, अडाणी आणि शीलहीन माणसाचे केवळ पैशामुळे दास.

          नवीन युगात शब्दांचे अर्थ बदललेले ‘ द स्पेलिंग ऑफ सक्सेस इज नॉट सक्सेस बट मनी’

          या सुखाला वंचित असलेल्या, पैशाने बरीच सुखे विकत घेता येत असल्याने  माणसाला या सुखाचा शिकारी बनण्यासाठी अनेकदा आपल्या चिरंतन तत्त्वाला मूठमाती द्यावी लागते. तत्त्वे, सत्य, पवित्रता, सद्विचार, नीती, शील इ. अनेकांची विक्री करावी लागते. करण्यास परिस्थिती भाग पाडते.

 

कनक, कांता, कीर्ती।। या मानवाच्या आपत्ती।।

          संयमाच्या, धर्माच्या मर्यादेने या गोष्टीकडे पाहिले तर त्या आपत्ती भासणार नाहीत. पण माणसाला हे शक्य होत नाही.

          या पैशासाठी गझनीच्या महमदाने सोरटी सोमनाथाचे भीषण स्मशान केले. कनक ही आपत्तीच ठरली.

          पृथ्वीराज चौहानाने संयोगितेला पळविले. त्याचा सूड घेण्यासाठी जयचंद राठोडने महमद घोरीला आमंत्रण दिले. आणि शेवटी भारतीयांवर आक्रमणाची आपत्ती ही कोसळलीच.

          कीर्ती मिळावी, पेशवेपद मिळावे यासाठी राघोबादादा इंग्रजांना शरण गेला. भाऊबंदकी निष्ठेने लढविली. अन् अपकीर्तीचा धनी झाला. अशा रीतीने या गोष्टी समोर आल्या की माणसाचा विचार, विवेक लुळा पडतो अन ह्या आपत्ती ठरतात.

मरणात खरोखर जग जगते

हे राजकवी भा.रा. तांब्यांचे वचन. मरणाला आपण रमण मानले पाहिजे. रमण म्हणजे प्रियकर. ज्या उत्कटतेने आणि उत्कंठतेने तो आपल्या प्रेयसीला भेटावयास जातो त्याच तèहेने आपण मरणाला सामोरे गेले पाहिजे.

          जगात मरण नसते तर जग जगले असते का ? मानवच नव्हे तर इतर प्राणीसुद्धा मरतात म्हणून नवीन जन्माला आल्यावर जगू शकतात.

          भीष्माला इच्छा मरणाचा वर होता. पण शेवटी त्याला या जगाचा कंटाळा आला आणि त्याने जगाचा त्याग केला.

          जगाचे रहाटगाडगे  चालण्यासाठी मरण हे हवे. अमरत्वाचा, चिरंजीवित्वाचा हा शाप ठरतो. ती दगडाची चिरंजीवता ठरते.

          माणूस शरीराने मरत असला तरी तो त्याच्या बदलत्या रूपात त्याच्या मानवतावादी कार्याने अमर होत असतो. बुद्ध, शिवाजी महाराज, कालिदास, म. गांधीजी हे देहाने नसले तरी कीर्तीने अमर आहेत अथवा ते नष्ट झाले तरी ज्योतीच्या रूपाने अमर आहेत. फूल गळून त्याचे फळ बनते म्हणजे अमरत्व लाभते. म्हणून मर्त्य पार्थिव असे या जगी नाहीच. अवस्था, रूपे बदलतात एवढेच काय ते !

 

स्थितीचा असे किंकर प्राणीमात्र

          मनुष्य परिस्थितीचा दास. ‘चार दिवस सासुचे, चार दिवस सुनेचे’ या न्यायाने काही दिवस भाग्याचे, वैभवाचे लाभतात.

          संधी मिळताच दुर्दैव आपले रूप प्रगट करते.

          दुर्दैवाचा फेरा आला की वैभवाच्या शिखरावर डौलाने तळपणारा माणूस पायथ्याशी फेकला जातो. त्याच्या कर्तबगारीस बुद्धिमत्तेस जबरदस्त टोला बसतो.

          बलाढ्य, वैभवसंपन्न श्रीकृष्णाचे प्रिय असे पांडव विराटाघरी सेवक झालेच ना ? चौदा चौकड्यांचे राज्य उपभोगणारा दशानन वेळ येताच वानराकडून पराभूत झालाच ना ? फार कशाला ज्याच्या राज्यावर कधीच सूर्य मावळत नव्हता असे ब्रिटिशांचे साम्राज्य आज लोप पावलेच ना ? हिटलरचीही तीच गत झाली.

          परिस्थितीचे आव्हान माणसाला स्वीकारता नाही.

          एक क्षण असा येतो की, मानवाने आपल्या साèया शक्ती पणास लावल्या तरी त्याला निसर्गशक्तीपुढे नमते घ्यावेच लागते.

नाही निर्मळ जीवन, काय करील साबण ?

          जीवन हे अंतरंगापासून शुद्ध हवे. कावळा अन् बगळा यांची कथा. बगळा शुभ्र-कावळ्याला राग येतो. साबणाची वडी संपते काळेपण अधिकच तुकतुकीत होते. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?

          बाह्य सौंदर्य हे खरे, शुद्ध आणि स्वाभाविक सौंदर्यच नव्हे. कृत्रिम साधनांनी आतील कुरूपताही झाकली जाणे अशक्य.

          अंगाला भस्म लावून पावित्र्य प्राप्त होत नाही. मग हा मान गाढवास द्यावयास हवा. ते राखेत कमी का लोळतं? अंतरंगात पावित्र्याचा अभाव, बाहेर बेगडी अन् कृत्रिम झगझगाट म्हणजे मेलेल्या माणसाला शृंगारल्यासारखे नव्हे का ?

          आंतरिक जीवन शुद्ध हवे. पांढरे शुभ्र खादीचे कपडे चढवून उपयोग काय ? जीवनाशी आणि जीवनमूल्याशी प्रामाणिक हवे.

          आंतरिक, पवित्र, प्रेरक आणि प्रभावशील तेज असल्यावर स्नो, पावडरची काय आवश्यकता ?

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल

          आशावादी तत्त्वज्ञानाचा नंदादीप ठरण्याजोगे हे वाक्य.

          मानवी जीवन दु:ख, व्यथा, वेदना, विसंवाद, यातना, अपघात इत्यादींनी ग्रासलेले. ‘हॅपीनेस इज बट अ‍ॅन ऑकेजनल एपिसोड इन द युनिव्हर्सल ड्रामा ऑफ पेन’ हे हार्डीचे वाक्य खरे. पण ही जीवनाची एकेरी, एकांगी बाजू.

          माणूस आशेवर जगतो. आशा वेडी असते असे म्हणतात. पण ती जर शहाणी असती तर सर्व जगाला तिने वेडे केले असते.

          मानवी जीवनात चिरंतन दु:ख नसते हे आपणास मान्य करावे लागेल. अमावास्येच्या अंधकारानंतर सूर्योदय हा होतच असतो, भारताला स्वातंत्र्य मिळाले ते यामुळेच.

          फक्त दु:खाचा विचार करून कुुढत बसण्यापेक्षा ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल’ या न्यायाने संकटास तोंड द्यावयास हवे.

          भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमानकाळात लढणे हेच इष्ट.

          दु:खातही सुख लपलेले असते. रात्रीनंतर जसा सूर्योदय होतो तसेच दु:खानंतर  सुख येणार असते. यास्तव दु:खाबाबत दु:ख करण्यात पुरुषार्थ नाही.

निंदक आमुचा सखा, आमुची वस्त्रे धुतो फुका

          मानव हा स्तुतीप्रिय आहे. परंतु कोणी निंदा केली की आमच्या डोक्यात आग धुमसते. संत तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी.

          मित्रापेक्षा हे शत्रू अधिक मौल्यवान. मित्र आपले फक्त गुण दाखवितो. आपल्यावरील प्रेमामुळे ते गुण त्याला खूप मोठे दिसतात. कधी कधी आपले दोषसुद्धा त्याला गुणच वाटतात.

          निंदक हा आपल्या दोषावर कावळ्याप्रमाणे प्रहार करतो.

          आपल्यातल्या बेकीमुळे, फुटीरपणामुळे आपला पराभव झाला. आपल्या राज्याला धोका निर्माण झाला हे समजल्यावर बारभाईंचे कारस्थान रचले गेले.

          आजच्या या लोकशाहीच्या युगात विरोधी पक्ष हा उपकारक आणि विधायकच ठरतो. सत्तारूढ पक्ष चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन तो घालतो.

          परीट मूल्यासह आपले कपडे स्वच्छ करतो. निंदक हा विनामूल्य आपले दोष, आपल्यातील अस्वच्छता नाहीशी करतो.

प्राप्तकाल हा विशाल भूधर

          केशवसुतांचे वचन. हा काल म्हणजे पर्वत  बेकारी, आर्थिक विषमता. नीतीची पायमल्ली, सत्यं , शिव, सुंदरम् यांना आलेली अवकळा. हे पाहिले की माणूस निराश, उदास होतो. पण ही संधी आपण हुकवली न पाहिजे, सत्कृत्ये केली पाहिजेत. कारण ‘ऑपोर्च्युनिटी नॉकस वन्स अ‍ॅट द डोर’. फार पूर्वी कुणा अनामिकांनी सुंदर लेणी खोदली. त्याची कला अजरामर अन आनंददायी राहिली. ते कलावंत अमर झाले.

          कळते पण वळत नाही’ असेल आपल्या बाबतीत घडते. आजच्या काळात राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता. ती साधण्यासाठी हीच वेळ मोक्याची.

          कल करे सो आज करो, आज करे सो अब’ हे ध्यानात घ्यावयास हवे.

          केशवसुतांनी उमेदीने सतत कार्यशील राहून समाजसेवेचा आदर्श घालून देण्याचा संदेश या ‘तुतारी’तून दिलेला आहे.

असंतोष हेच सुधारणांचेमूळ

          जीवनात जो थांबतो त्याचे कार्यही थांबते. थांबला तो संपला.

          मानवी संस्कृतीची गंगा आपले पात्र विस्तृत अन् विस्तीर्ण करीत वाहात आहे. असंतोषाच्या खडकावर ती टकरा देत आहे.

          ज्ञानेशाचे उदाहरण. रूढी, कर्मकांड, धर्म यांच्या नावाखाली राजरोसपणे ही जनता ऐहिक सुखोपभोग घेत होती. समाजाचा गाडा हा या धर्माच्या चिखला रूतला होता. असंतोषामुळेच त्यात सुधारणा झाली.

          आगरकरांचा काळही असाच. ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हतीŸ।’ हे वचन त्यांनी खोटे ठरवले. अन्यायाविरुद्ध, अधोगतीविरुद्ध असंतोष हा उसळलाच पाहिजे तेच सुधारणांचे मूळ.

          असंतोष नसता तर स्वातंत्र्य मिळाले नसते, असंतोष नसता तर स्त्रियांना समान हक्क मिळाले नसते. म्हणून असंतोष (पण सात्विक प्रकृतीचा) हेच सर्व सुधारणांचे मूळ.

अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा

          मनुष्य हा सोयीस्करपणे काही गोष्टी विसरतो. ज्या तत्त्वांचा अधिकारावर नसताना जयघोष केला तीच तत्त्वे  तो नंतर पायदळी तुडवितो.

          सूर्योदयसमयी पक्षी सूर्याचे स्वागत करतात. सिंह, वाघ जंगलात दडतात. चोर, दरोडेखोर लपतात. पण मध्यान्ही हाच सूर्य ताप देऊ लागतो.

          ज्या मातापित्यांनी आपणास वाढवले ते जर साध्या गावठी वेषात असले अन् आपण साहेब बनलेले असलो तर इतरांदेखत मातापित्यांना आपण ओळख देत नाही असे बèयाच जणांबाबत घडते.

          विनम्र, शांत, सोशिक, प्रेमळ, उदार अशी सून सासू झाल्यावर लगेच आपल्या गुणाला विसरते. अन सासूपणाचे गुण उधळू लागते.

          सात्विक माणसे उच्च पदावर जाताच आपल्या गुणास पारखी होतात. त्यावेळी त्यांचा स्वार्थ बळावतो आणि श्रेष्ठ मूल्यांचे जतन त्यांच्याकडून होत नाही. तो त्या पदाचा, खुर्चीचा गुण परंतु याला अपवादही खूप सापडतील. आगरकरांसारखी माणसे वा गांधी, विनोबासमान संतजन.

जीवन हा एक रबरी फुगा आहे

जीवनाकडे आपण हसèया खेळकर दृष्टीने पाहिले पाहिजे.

          रबरी फुगे फुगविण्यात निर्मितीचा आनंद असतो.

          जगात अगणित दु:खे. पण या निर्मितीच्या आनंदामुळेच मनुष्य जीवनावर प्रेम करतो.

सी.व्ही. रामन अविरत कष्ट करणारा शास्त्रज्ञ, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा शिवाजी, समाजाविषयीच्या कळकळीमुळे कार्यप्रवण झालेले आगरकर ही उदाहरणे याचीच साक्ष देतील आपण स्वत:ही तसेच वागतो.

          विद्या, मैत्री, कीर्ती, प्रीती हे रबरी फुुगेच होत. ते फुगे कधीकधी जास्त फुगल्यामुळे फुटून जातात. तरी पण फुगविताना झालेेला आनंद हा खरा अन् उच्च.

          यातून मानवी जीवनात कर्तृत्व करण्यास आवश्यक असणारी शक्ती असते पण ती सुप्त असते. तिच्यात प्राण ओतावा-रबरी फुग्यात ओततो तसा. तेव्हाच दृष्य स्वरूप मनाला मोहीत करते.

माती असशी -मातीस मिळशी

          मानवी जीवनातील एक भीषण सत्य.

          मानवी जीवन हे क्षणभंगुर आहे. सूर्योदयापूर्वीचे धुके जसे वा पाण्यावरचा बुडबुडा जसा.

          या आपल्या मर्यादेची माणसाला डोळस जाणीव असावी.

          माती तुडविणाऱ्या  कुंभारास मातीने हेच पटवून दिले आहे. शेवटी मातीच्या कुशीतच मानवी जीवनास पूर्ण विसावा मिळणार आहे.

          पांघरशी जरी असला कपडायेशी उघडा, जाशी उघडा हेच खरे.

          म्हणून या मानवाने धर्म, श्रीमंती, शिष्टाचार, जात, वर्ग वा पंथ यांचा वृथा अभिमान न धरता समानतेने वागले पाहिजे. कारण कोणत्याही माणसाचे जीवन हे असते ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती’

 

श्रम हाच परमेश्वर

          स्वेदाची ही अखंड, अमर आणि अक्षर गंगा.

          आयुष्य अल्प. पण त्यात कार्य करण्यास वाव फार.

          दे रे हरी Ÿ। खाटल्यावरी ।। हे ऐदीपणाचे अन् नामुष्कीचे लक्षण

          श्रमाचा, रक्ताचा पैसा तोच खरा पैसा. त्यापासून मिळणारे समाधानही उच्च.

          आयुष्यातील ध्येय, सुख प्राप्त करून घेण्यासाठी श्रम करण्याची नितांत आवश्यकता. याच कारणामुळे आज रशिया सर्वच बाबतीत पुढे आला आहे. गगनाला गवसणी घालणारे यश मिळविण्यासाठी आर्कमिडीजपासून आइनस्टाईन, जयंत नारळीकरापर्यंत सर्वांना श्रम हाच परमेश्वर  मानावा लागला आहे.

          परमेश्वर प्राप्तीने जी एक अलौकिक तृप्तीची भावना निर्माण होते अगदी तशीच भावना श्रमातून होते.

          जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी मंदिरातील देवाला न पूजता मानवांच्या सेवेला, श्रमाला पूजलेले असते. म्हणून ते मोठे झालेले असतात. भारताच्या इतिहासात अशा प्रकारची उदाहरणे अनेक आहेत.

विना सहकार नही उद्धार

          आज सहकाराच्या शक्तीचे सामर्थ्य आणि माहात्म्य सर्वांना पटलेले आहे.

          सहकारामुळे ‘दसकी लडकी एकका बोजा’ असे होत नाही. एखादे कार्य जास्तीत जास्त व्यवस्थित होऊ शकते. लोकशक्तीचे सामर्थ्य जाणवते.

          या सहकारी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे रशियात शेतीचे अन इतर उद्योगधंद्याचे  उत्पादन वाढले. भारतातील सहकारी साखर कारखाने  आणि पतसंस्था याची समर्पक अन् सुंदर साक्ष आहेत.

          या सहकारामुळे फक्त एखादा मनुष्य सुखी होत नाही तर सर्वजण सुखी होतात.

          सहकाराचे हे तत्त्व पशुपक्ष्यांत नेहमीच पाहावयास मिळते. एकमेकांच्या ससहकार्यानेच शत्रूस ते पराभूत करतात.

          फक्त सहकारात राजकारण, मत्सर, वैयक्तिक हेवेदावे शिरता कामा नयेत. सहकार म्हणजे एका कुटुंबातील लोक. रक्ताच्या नात्याप्रमाणे वागून व्यक्ती आणि समाज विकास साधणारी प्रणाली म्हणजे सहकार. हे आचरणात आणले पाहिजे.

शीलं परम् भूषणम्

          मानवी जीवनातील श्रेयस असा भाग. संयम आणि नियम यांनी मानवांचे जीवन उज्ज्वल अन् उत्कृष्ट बनते.

          आयुष्यात पैशानेच सर्व गोष्टी मिळविता येतात हे म्हणणे अपुरे.

          चारित्र्य हे पैशापेक्षा महान. जीवनात तेज, बल प्राप्त करून देण्याची त्यात शक्ती. अनुसुयेची परीक्षा घेण्यासाठी  आलेल्या देवांना तिने बालक बनवून भोजन घातले.

          सर्व भूषणात श्रेष्ठ असे हे भूषण. ते अमर अन् कालातीत. माणूस मरतो पण त्याच्या चारित्र्याच्या प्रभावाने तो अमर राहतो.

          इतर भूषणे नष्ट होणारी. क्षणिक कालामानाप्रमाणे निस्तेज होणारी. पण शीलवंताच्या व्यक्तिप्रभावाने दिपून जाणारे खूप कारण हे भूषण सदैव चेतोहारी असते. चिरंतन असते.

          पण शील म्हणजे काय हे ठरविता आले पाहिजे. पारंपरिक रूढीचा त्याग करणे शीलभ्रष्ट नव्हे, आंतरविकासास मारक ठरणाèया गोष्टीही शीलभ्रष्ट नव्हेत.

सत्यमेव जयते

          सत्य न मरते दळभारे’ म्हणजेच बळाच्या जोरावर सत्य कधीही नष्ट होत नाही. शेवटी असत्याला, अन्यायाला पराभूत व्हावे लागते व जगात शेवटी सत्याचाच विजय होतो. पण माणूस शेवटपर्यंत सत्याशी एकनिष्ठ राहत नाही. सत्याच्या विजयासाठी प्रदीर्घ तपश्चर्येची आवश्यकता असते.

          असत्याच्या मार्गाने लवकर यश मिळते, असत्याचा विजय झाल्यासारखा वाटतो. पण तो विजय क्षणभंगुर असतो. आजवर जगातील विविध संघर्षाची बाह्य रूपे भिन्न भिन्न असली तरी अंतरी एकच स्वरूप आहे आणि ते म्हणजे सत्य आणि असत्य यांच्यातील झगडा.

          राजा हरिश्चंद्राचे उदाहरण घ्या त्याला पुष्कळ व  अविरत त्रास सहन करावा लागला पण शेवटी त्याचाच विजय झाला.  राम-रावण युद्ध अन् कौरव-पांडव युद्ध यातून शेवटी सत्याचाच म्हणजे राम व पांडवांचाच विजय झाला. कृष्णाला ठार मारण्याचा कंसाने कितीदा तरी प्रयत्न केला. सॉक्रेटिसचे सिद्धांत चुकीचे ठरवून त्याला विषप्राशन करायला लावण्यात आले. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर लटकावे लागले पण या झगड्यात कंस मारला गेला. कृष्ण विजयी ठरला. सॉक्रेटिस अजरामर झाला. येशू देवपदाला पोहोचला. ‘सत्यमेव जयते’ हेच खरे तत्त्वज्ञान. त्याचीच पूजा सदैव केली जावी हेच योग्य.

          सत्याचा जय हा मानवी विवेकाचा, बुद्धीचा, धर्माचा जय होय. सत्याचा जय हा शाश्वताचा जय असतो. चिरकालीन चिरंतनाचा जय असतो. त्याचे सामर्थ्य सर्वात अधिक असते. ते तेजस्वी असते. ते अजरामर असते !

          याबरोबरच अर्थात शिव आणि सुंदर हातात हात घालून येतात आणि त्यामुळे मानवी जीवन सुखसंपत्तीने न्हाऊन चिंब होते.

विद्वान सर्वत्र पूजते

          मोठमोठी साम्राज्ये, संपन्न, संस्कृती,  पराक्रमी राजे नष्ट झाले. त्यांची कीर्ती कदाचित मागे राहिली असेल. त्यांना पूजनीय बिरुदही लागले असेल पण ते फक्त आपल्या देशापुरते.

          विद्वानांचे मात्र असे नाही. स्थल आणि काल यांच्या मर्यादांनी तो जखडलेला नाही. मानवी मनाला आव्हान देणारे आणि आवाहन करणारे साहित्य पूजनीय असेच ठरले आहे.

          कालिदास, शेक्सपियर, भवभूती, गॉर्की, इब्सेन हे साहित्यिक हे विद्वान आज जगद्वंद्य ठरले आहेत. न्यूटन, आईनस्टाइन, जयंत नारळीकर सारख्या शास्त्रज्ञांचाही त्यात समावेश होतो. मानवी जीवन सुखी, संपन्न नि समृद्ध करण्यासाठी अविरत झटणाèया सरस्वतीच्या लाडक्या सुपुत्रांची पूजा न झाली तरच नवल.

          विद्या ही नेहमीच फलदायी असते. सर्वांनाच फलदायी असते. ती दिल्याने वाढतच जाते. तिच्यामुळे मानव हाच देव बनू शकतो. त्याच्या प्रतिभेला बहार, कर्तृत्वाला उधाण व व्यक्तिमत्त्वाला धुमारे फुटतात. ते या विद्येच्या उपासनेमुळे आणि अशा विद्येचे जे उपासक ते विद्वान सदासर्वदा पूजले जातात. पौराणिक काळात, साम्राज्यात सम्राटापेक्षा खरी सत्ता या विद्वानांचीच असायची.

व्यक्ती तितक्या अभिव्यक्ती

          जगामध्ये वावरताना प्रत्येकाच्या अनुभवास ही गोष्ट येते.

          नाना तèहेची चित्रविचित्र पेहरावाची, चमत्कारिक अन् आश्चर्यकारक स्वभावाची माणसे या पृथ्वीतलावर राहतात.

          जगाला त्यामुळेच एका प्रकारची गती लाभली आहे. माणसाच्या या संघर्षातूनच जगाचा विकास साधला आहे. काही उंच तर काही ठेंगणे, काही बुद्धिमान तर काही निर्बुद्ध काही जण भलतेच शांत तर काही कमालीचे चंचल, काही शिष्ट तर काही परिशिष्टासारखे, असे काही फरक दाखविता येतील.

          यती आणि ययाती हे दोघेही नहूष राजाचे मुलगे, पण एकाला त्यागात  आनंद लाभतो तर दुसèयाला भोगात. एकाच घरातील दोन भावात हा भेद. तर जगातील प्रत्येक माणसात भेद हा असणारच.

          या विविध अभिव्यक्तीने माणसाला एखाद्या सत्याचे सम्यक दर्शन घडते. सर्वांगीण विचार समजतो. आजच्या काळात अशा विविध अभिव्यक्तीची नितांत जरुरी आहे. उलट या अनेक मतामुळे गोंधळच माजण्याची शक्यता असते. त्यामुळे सत्यासत्यतेची डोळसपणे पारख करता येणे कठीण होऊ जाते.

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

          या जगात मनुष्यप्राणी हा पूर्णपणे पराधीन आहे. त्याला आयुष्यात कधी काय भोगावे लागेल, याचा काही एक अंदाज सांगता येणार नाही तसेच त्याला त्याची कारणमीमांसाही समाधानकारक करता येत नाही. अशा वेळी ‘दैवं चैवात्र पंचमम्’ हेच खरे वाटू लागते. नशीब ही काही तरी अजब चीज असून ती अदृष्य शक्ती जशी आपल्याला फिरवेल तसे फिरावेच लागते. मानवाने निसर्गातील बऱ्याचशा मोठमोठ्या शक्तीवर विजय मिळविला आहे हे म्हणणे मान्य; पण त्यात तो संपूर्ण यशस्वी झाला नाही म्हणणे मान्य करावयास हवे.

          मृत्यू, दैव इत्यादी गोष्टींवर मानवाने अद्याप विजय मिळविला नाही. स्वत:च्या विकारातिरेकावर आणि वाईट प्रवृत्तीवर त्याला अजून इलाज सापडला नाही.

          दैवाची दुर्गती मृत्यू यांच्या हातचे बाहुले म्हणजे मानव, बालकवी, गडकरी यांच्यासारखे कर्तृत्ववान साहित्यिक, म. गांधी, केनेडी यांच्यासारख्या मानवतेच्या पुजाèयांना आपले कार्य अपुरे ठेवून जीवनाच्या रंगभूमीवरून निघून जावे लागते.

          स्वत:च्या वाईट प्रवृत्तीवर मानवाला विजय मिळविता आला नाही. म्हणून गॉर्कीसारखे विद्वान, ही इज एट टू बी अ मॅन असे म्हणतात. यातून मानवाचे पराधीनत्वच प्रत्ययास येते.

          निसर्गावरही त्याने सर्वस्वाने प्रभुत्व मिळविले नाही. रोगराई, खगोलशास्त्र इ. अशा अनेक गोष्टी त्याला वाकवू शकतात..एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच मनुष्य प्रयत्नाच्या जोरावर अपेक्षित गोष्टी साध्य करू शकतो पण एका विशिष्ट अवस्थेनंतर त्याला दैव वा देव, नशीव व पूर्वसकृत हे मानावेच लागते.

          एवढेच कशाला माणूस अगदी जन्मल्यापासून पराधीन आहे. जन्मताच त्याला आई-वडील आधारास्तव  हवे असतात. मोठे झाल्यावर भावंडांवर विसंबून राहावे लागते. तरुणपणी जीवनाचा साथीदार हा हवा असतो. तर वार्धक्यात आपल्याला पुत्रपौत्रावरच अवलंबून जीवन जगावे लागते. म्हणून पराधीनत्व हा मानवाच्या ललाटीचा लेख आहे.

 

सैन्य पोटावर चालते

          युद्धामधील विजयश्री ही सैनिकांच्या मनोधैर्यावर अन् त्याचबरोबर त्यांच्या शौर्यावर अवलंबून असते.

          सैन्याला नुसते लढाऊ साहित्य देऊन भागत नाही. त्याच्या पोटातील आगही शमवावी लागते.

          युद्धात विजय मिळविण्यासाठी, शत्रूसैन्याची रसद तोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते त्याचे कारण हेच.

          पानिपतच्या युद्धात मराठ्यांना जे अपयश आले त्याचे एक कारण शत्रूंनी त्यांची नाकेबंदी केली असे सांगितले तर ते चूक ठरणार नाही.

          पोटातील आग शमली तरच त्याला हातातील हत्यार चालविता येईल. पण ‘पोटावर’ म्हणजे नुसत्या पोटासाठी नव्हे. सैनिकाच्या घराची, कुटुंबाची बायको मुलांची वात्सल्यपूर्ण काळजी घेतली; त्यांना संरक्षण दिले तरच ज्यांच्यासाठी सैनिकाचा जीव अडकतो तो कमी होऊन त्याच्या शस्त्राला रक्ताची तहान लागते.

          पोटावर’ सैनिकाच्या व्यक्तिमत्त्वाचा, भावनांचा, कल्पनांचा, स्वप्नांचा विचार व्हावयाला हवा. त्यांच्या भावना मारून वा दडपून टाकल्यावर शस्त्र हे असून नसल्यासारखे आहे.

असतील शिते तोवरी जमतील भुते

          माणसाजवळ पैसा असेल तोवर सर्वजण त्याची स्तुती करतात. एकदा का पैसा संपला की त्याला कोणी विचारित नाही.

          माणूस जात्याच स्वार्थी आहे. फुकटात जेवढे व जितके मिळेल तेवढे त्याला हवे असते. त्यासाठी एखाद्या मूर्खासही विद्वान मानण्यास तो तयार होईल.

          एकच प्याला’ यातील सुधाकराची सांपत्तिक स्थिती उत्तम होती व त्याला समाजात सन्मान होता तोपर्यंत सारे दारुडे अवतीभोवती गोळा झालेले होेते, पण अन्नान्न दशा प्राप्त झाल्यावर सारे निघून गेले.

          नित्य व्यवहारातही हे दिसून येते. एखाद्या वृद्धाजवळ पाच पन्नास लाख रुपये असतील तर सारेजण त्याची थुंकी झेलतील, पण पैसा नष्ट झाला की संपले.

          पैशाबाबतीत नव्हे. तर तारुण्य , सत्ता, रूप हे संपल्यावरही अशीच अवस्था होत असते. म्हणून माणसाने प्रथमपासून जपून वागले पाहिजे.

समतेचा ध्वज उंच धरारे !

          स्वातंत्र्य, समता आणि  बंधुता ही आजच्या युगाची तत्त्वत्रयी आहे. त्यातही समता हाच लोकशाहीचा  प्राण आहे. आधार आहे. ही समता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक लोकशाहीवादी राष्ट्र आपल्यापरीने प्रयत्न करीत असते.

          या जगात धर्माच्या नावाखाली, जन्माच्या नावाखाली, रंगरूपाच्या नावाखाली असंख्य भेदभाव निर्माण झाले. श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या नावाखाली हजारो वर्षे एकमेकांनी एकमेकांवर अन्याय केला. जुलूम, अत्याचार यांनी पददलितांना भरडून काढले. त्यांच्या प्रगतीच्या वाटा सत्ताधीशांनी रोखून टाकल्या. त्यांना साधे माणुसकीचेही हक्क नाकारले. या अन्यायाविरुद्ध झगडे उभे राहिले. अब्राहम लिंकन, म. फुले यासारख्या थोर समाजसेवकांना व नेत्यांना आयुष्यभर परंपरा व रुढी विरुद्ध झुंजावे लागले. म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर लढा द्यावा लागला. सनातनी विचारांच्या लोकांचा रोष पत्करावा लागला. सत्याग्रह, उपोषणे करावी लागली. म. गांधींना तर आत्मबलिदान  पत्करावे लागले.

          वास्तविक श्रेष्ठ-कनिष्ठता, उच्च-नीचता माणसाने निर्माण केली आहे. ती स्वार्थाने जोपासली आहे. त्या विषमतेचा नायनाट केला गेलाच पाहिजे. हजारो वर्षे अन्याय सहन करणाèया पददलितांना न्याय मिळालाच पाहिजे. यासाठीच  केशवसुत आग्रहाने सांगतात, ‘वीरांनो तर त्वरा करा रे - समतेचा ध्वज उंच ध्वज धरा रे !

ध्येय हाच देव

          मनुष्याला त्याचे जे मोठेपण प्राप्त झाले आहे ते त्याच्या कर्तृत्वामुळेच. अन्न मिळविणं आणि निवारा शोधणं या गोष्टी सर्वच प्राणी करतात. पण माणसाने अन्न, वस्त्र, निवारा या गरजेच्या गोष्टी मिळवतानाही आपली एक संस्कृती निर्माण केली, धर्म निर्माण केला. जीवनपद्धती आदर्शाप्रत नेण्याचा प्रयत्न केला. अशा त्याच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नात ‘ध्येयवाद’ ही सर्वात उल्लेखनीय गोष्ट आहे.

          प्रत्येक मनुष्याने आपल्यापुढे एक ध्येय ठेवले पाहिजे. त्या ध्येयप्राप्तीसाठी आयुष्यभर झटले पाहिजे. ते साकार करण्यासाठी अतोनात कष्ट सोसले पाहिजेत. ध्येयवादी माणसे अशी आपल्या ध्येयाची पूजक बनतात.

स्वराज्य स्थापनेचे ध्येय शिवाजी महाराजांना होते. आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केले. अखेर त्यांना यश आलेच. श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त यांना जीवनधर्म सांगावयाचा होता त्यांनी तो अखेरपर्यंत सांगितला. अनेक दुष्टांनी त्यांचा जन्मापासून छळ केला पण ते त्यांना शरण गेले नाहीत. अब्राहम लिंकन, महात्मा फुले, म. गांधी, डॉ. आंबेडकर यांची जीवनचरित्रे तर आजच्या जगासमोर आहेतच. समाजोद्धाराच्या जाणिवेने त्यांनी आपल्या अंगिकृत कार्यासाठीच सारे आयुष्य वेचले. ही सर्वच माणसे ध्येयपूजक होती. ध्येयवेडी होती.

          सामान्य माणसानेही आपल्यापुढे एखादे ध्येय अवश्य ठेवावे. त्याची पूजा करावी. आपल्या साèया शक्ती पणाला लावून त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी खटपट करावी, त्याला यश हे मिळेलच मिळेल.

केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे.

          समर्थ रामदास स्वामी यांनी सामान्य माणसाला उत्कर्ष साधण्यासाठी उपदेश केला आहे. अशा श्रेष्ठ तत्त्वज्ञानाने भरून राहिलेल्या त्यांच्या विचारधनापैकी वरील विचार हा एक तेजस्वी विचारकणच आहे.

          आजवर आपल्याकडे ‘‘जे जे घडेल ते ते नशिबानेच’’ अशी विचारधारा वाहत आली आहे. ‘‘भोक्तव्य गोष्टी अटळ असतात’’ असाच समज चालत आलेला आहे. देव, दैव आणि नशीब यावर विसंबून माणूस हताश, निराश झालेला आढळतो.

          परंतु वरील उक्तीत रामदास ममात्र प्रयत्नवादाचा पुरस्कार करताता. ‘यत्न तो देव जाणावा’. प्रयत्न हाच मुळी त्यांचा देव आहे. प्रयत्नांतीच परमेश्वर भेटतो, असाच विचार ते मांडतात. आणि माणसाला कर्तव्य करण्यास उद्युक्त करतात. ‘असाध्य ते साध्य करिता सायास’ असे तुकारामानेही एके ठिकाणी म्हटले आहे. कोणतीही गोष्ट आपल्या प्रयत्नबळाने आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आधी प्रयत्नांना आरंभ तरी केला पाहिजे. मग ते प्रयत्नच पुढच्या प्रयत्नांची दिशा दाखवितात व अंती यश हे खात्रीने मिळतेच.

          शिवाजी महाराजांनी वाडवडिलांचेप्रमाणे मोंगलांची सरदारकी न पत्करता स्वतंत्र स्वराज्य स्थापन करण्याचे ठरविले. निश्चय केला तसे प्रयत्न केले. त्या प्रयत्नांनी त्यांना यश मिळाले. पारतंत्र्य नाहीसे करायचेच हा निश्चय लो. टिळक, म. गांधी, पं. नेहरू आदी नेत्यांनी केला. साऱ्यांच्या प्रयत्नांनी हा देश अखेरीस स्वतंत्र झालाच. न्यूटन, केप्लर, एडिसन आदी संशोधक कोलंबसासारखा साहसी, दर्यावर्दी, शेर्पा तेनसिंगसारखा गिर्यारोहक किंवा आर्म स्ट्राँग, कल्पना चावला सारखे अंतराळवीर यांचे प्रयत्न, त्यांनी घेतलेले कष्ट व त्यांना मिळालेले यश ध्यानात घेतले की असेच म्हणावेसे वाटते - ‘केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे’.

 

धीर धरीरे धीरा पोटी ।।असती मोठी फळे गोमटी।।

          केशवसुतांनी आपल्या कवितेमधून हा एक थोर विचार समाजासमोर ठेवला आहे. समर्थ रामदासांनीदेखील परकीय आक्रमणाने भेदरून गेलेल्या समाजाला असाच संदेश दिला होता....‘धीर धरा धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका

          कधी कधी काळ  विपरित येतो. संकटामागून संकटे येतात. अपयशामागून अपयश येते. अशावेळी माणूस घाबरून जातो. त्याचा आत्मविश्वास ढळतो. कधी कधी तो इतका निराश होतो की हाती घेतलेले काम तो मध्येच सोडून देतो. आपले सर्व प्रयत्न टाकून देतो व माघार घेतो. अशाने केवळ कार्यहानी होते. माणसाने कधीही धीर सोडता कामा नये. आत्मविश्वास गमावता कामा नये.

          विजेच्या दिव्याचा शोध लावण्यासाठी थॉमस एडिसनने नऊ हजार वेळा प्रयोग केले. त्या कामी त्यांने लाखो रुपये खर्च केले. मेरी क्युरी व पेरी क्युरी यांनी जीव धोक्यात घालून असंख्य प्रयोग केले व अखेरीस रेडियमचा शोध लावला. न्यूटनने किती तरी वर्षे चिंतन, मनन करून गुरुत्वाकर्षणासारखा सिद्धांत मांडला. कोलंबसाने किती संकटे सहन करून अमेरिकेचा किनारा शोधला. तेनसिंगने त्रास सोसून एव्हरेस्ट सर केले. यापैकी अपयशाने कोणीही खचून गेले नाही. हेच त्यांच्या पुढील नेत्रदीपक यशाचे रहस्य आहे. राजकारणात, समाजकारणात, संशोधनात नेहमीच अशी चिकाटी, आत्मविश्वास, अपयशावर मात करण्याची जिद्द लागते. यासाठीच हे लक्षात ठेवले पाहिजे की माणसाने केव्हाही धीर धरावा. या धीरामुळेच शेवटी यशाची गोड फळे चाखावयास मिळतात.

 

थांबला तो संपला....

          गतिमानता हा जीवनाचा धर्म आहे. वाढत जाणे, विकसित होत जाणे, प्रगत होत जाणे म्हणजे जगणे. जगण्यालाच ‘जीवन’ असेही म्हटले जाते. जीवन म्हणजे पाणी. पाणी सदैव पुढे पुढे वाहात असते. झèयाचा ओहोळ होतो. ओहोळाचा ओढा होतो. ओढा नदीला मिळतो. नदी सागराला मिळते. सागरमय होते. तसेच मानवी जीवनाचेही आहे. ‘आहे तेच उत्तम. त्यातच समाधान मानू’ ही वृत्ती सामान्य प्राण्यांची झाली. माणसाला आहे त्याहून अधिक व चांगले हवे असते. तो सदैव अतृप्त असतो. जग आजच्याहून उद्या नवीन असते. त्या नाविन्याचे आकर्षण त्याला हवे. नवे ते हवे हे त्याच्या जीवनाचे सूत्रच आहे. त्यामुळेच त्याचे जीवन सुखी, संपन्न, विविधतेने नटलेले बनते. साहस व कर्तृत्व त्यातूनच फुलते. एकाग्रता व चिकाटी यातूनच आपोआप प्राप्त होते. राजकारणात, संशोधनात, अभ्यासात, उद्योग व्यवसायात सर्वत्रच अशी वृत्ती उमेद सदैव हवी. तरच आपली प्रगती होऊ शकेल. व्यक्ती आणि समाजानेही नेहमी गतिमान असले पाहिजे. बदलत्या काळाबरोबर पुढेच गेले पाहिजे. जे असे जाण्याचे नाकारतील ते मागे पडतील. शक्तिहीन होतील. केशवसुतांनी म्हटले, ‘निजती ते ठारच मरती’ यासाठीच हे सदैव ध्यानी ठेवले पाहिजे की, ‘कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला । थांबला तो संपला।

राखावी बहुतांची अंतरे

          कोणतेही कार्य साधण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी जी सूत्रे सांगितली आहेत. त्यातील हे एक महत्त्वाचे सूत्र आहे. असंख्य लोकांची मने आपल्याला जिंकता आली पाहिजेत, आपलीशी करता आली पाहिजेत. हे घडेल तर याच ओवीचा जो उत्तरार्ध तो आपोआप चालत येतो. तो म्हणजे -‘भाग्य येते तदनंतरे ’ याचा अर्थ असा की अनेकांची मने आपलीशी केलेली असली म्हणजे साहजिक त्यांचे सहकार्य आपल्याला लाभते व  व कोणतेही काम सहजासहजी होते.

          अर्थात लोकांची मने राखणे ही गोष्ट वाटती तितकी सोपी नाही. ती एक तपश्चर्याच आहेश. या जगात नानापरीचे लोक. आपमतलबी, स्वार्थी, ढोंगी,घमेंडखोर, शूर, वीर, गुणग्राहक, द्वेषी, मत्सरी, उपकार करणारे, अपकार करणे, अकारण शत्रुुत्व करणारे, अकारण मैत्रीही करणारे - अशा सर्वांना प्रसन्न ठेवणं फार कठीण आहे. ती तारेवरील कसरतच आहे. आपलाही स्वभाव मोठा विचित्र असतो. राग, लोभ, क्रोध, मोह, मद, मत्सर... अशा षड्रिपूंच्या आहारी आपण कधी जाऊ व कोणत्या गोष्टी करू याचा काय भरवसा ? त्यातून कोणकोण नि कसा दुखवला, तोडला जाईल कसे सांगता येणार ?

यावर उपाय एकच. आपण आपणाशी प्रामाणिक असावे. शक्यतो सर्वांचे हित पाहावे. सर्वांना सारखे मानावे. आपपर भाव ठेवू नये. त्यांच्या अडीअडचणीत साहाय्य करावे. संकटकाळी मदत करावी. सुख, आनंद वाढता करावा व दु:ख यातना कमी कराव्यात. दुसèयाचे दुर्गुण पाहू नयेत. त्यांच्या उणीवा काढू नयेत... असे वागण्याचा प्रयत्न केला की आपोआप लोक संतुष्ट राहतात. राजी राखले जातात. निदान त्यांचेकडून भलेपणा तरी पदरी पडेल. मग त्यांच्या साहाय्याने जे जे प्राप्त होईल ते ‘भाग्यच’ असे मानायला काय हरकत आहे

हे विश्वचि माझे घर...

          संत ज्ञानेश्वरांनी जणू छोट्या ओवीत जीवनाचे तत्त्वज्ञानच सांगितले आहे. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे अशी इच्छा असेल तर माणसाने कोणते ध्येय नजरेसमोर ठेवले पाहिजे त्याचे उत्तरच जणू या ओवीमधून दिलेले आहे.

          माणूस हा नेहमी संकुचितपणाने, स्वार्थाने व संशयाने आपली दु:खे वाढवीत असतो. व इतरांचे जीवनही दु:खी करीत असता. हे ‘माझे’ घर, ही ‘माझी’ संपत्ती, हे ‘माझे’ कर्तृत्व, ‘मी’ मोठा, ‘मी’ श्रेष्ठ अशा ‘मी’ च्या अहंपणाने त्याच्याभोवती एक अभेद्य असे कवच निर्माण होते. त्या अहंकारामधून स्वार्थ उद्भवतो. माझे सुख, माझा आनंद, माझे समाधान या पलीकडे तो कधीही कोणाचा व कशाचाही विचारच करू इच्छित नाही. या सुखासमाधानाच्या गोष्टी सरळ मार्गाने त्याला मिळाल्या तर ठीक अन्यथा इतरांवर अन्याय, जुलूम, जबरदस्ती, प्रसंगी खून, मारामाèया, रक्तपात करण्यासही प्रवृत्त होतो. यातून त्याला मिळते काय ? फक्त दु:ख.

          यासाठीच माणसाने आपली दृष्टी विशाल ठेवावी. आपल्या आशाआकांक्षा भव्य ठेवाव्यात. आपली वृत्ती निर्मळ ठेवावी. आपपरभाव ठेवू नये. हे सारे जे विश्व आहे. ते आपलेच घर आहे असे मानावे. या विश्वकुटुंबामधला मी एक जबाबदार घटक आहे असे मानावे. इतरांसाठी त्याग करावा. दुसèयाचे हित पाहावे. इतरांना आनंदी करावे. त्यांच्या सुखात सुख, दु:खात दु:ख मानावे. फार कशाला जीव, जनावरे, प्राणिमात्र या सर्वांवर प्रेम करावे अशा वृत्तीने मनुष्य जगू लागला की त्याचे क्षुद्रत्व नाहीसे होते. त्याच्याजवळील हिणकस जळून जाते. तोच मग या चराचराएवढा मोठा होतो. सदा आनंदी बनतो. सुखी, तृप्त बनतो. ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनानेच हा आदर्श आपल्यापुढे ठेवलेला नाही काय ?

कर्तव्यपूजा हीच ईशपूजा

          मनुष्यप्राणी हा भाविक प्राणी आहे. कशाची ना कशाची पूजा केल्यावाचून चैन पडत नाही. अनादि कालापासून त्याची ही वृत्ती त्याच्या आचरणामधूनच व्यक्त झाली आहे.

          प्रारंभी तो निसर्गाची पूजा करीत होता. अग्नी, वारा, पाऊस, जमीन, आकाश यांच्या भव्यतेने त्याला तिथे देव आहे असे वाटत होते. पुढे निसर्ग आणि मानव यांची त्याने सांगड घातली.  चित्रविचित्र कल्पना करून त्याने अनेक देवदेवतांची पूजा केली.

          कालांतराने आपला देश हाच देव. स्वातंत्र्य देवतेची पूजा हीच खरी पूजा. अशा त्याच्या विकसित मनाबरोबर देवत्वाबद्दलच्याही कल्पना विकसित झाल्या. पुढे पुढे चिंतन करता करता त्याला कळले आपले जे कर्तव्य ते प्रामाणिकपणाने, नि:स्वार्थीपणाने, उत्तमात उत्तम तèहेने करणे म्हणजेच ईशपूजा होय. गीतेसारख्या ग्रंथात भगवंतानेच सांगितले की, ‘कर्मण्येवाधिकस्ते’- कर्म करणे एवढाच तुझा अधिकार आहे.

          देवाची प्रार्थना केल्याने समाधान वाटते. त्याला फुले, फळे वाहिल्यानेही समाधान वाटते. पण त्याहून श्रेष्ठ समाधान आपण आपले कर्तव्य अत्यंत चोख रीतीने बजावले असता वाटते! अशा वर्तनात निर्भयता असते. आत्मविश्वास असतो. इतरांचे कल्याण करण्याची कळकळ असते. परमेश्वराची प्राप्ती म्हणजे तरी नेमके काय असते ? संतही असेच असत नाहीत का ? निर्भय,  शांत, समाधानी, इतरांचे कल्याण चिंतणारे ! मग झाले तर. तीच मन:शांती  प्राप्त करावयाची असेल तर आपल्या ‘कर्तव्याला’ देव माना. त्याची खडतर उपासना करा. ते कर्तव्य खरोखरीच देव बनेल व तुमचे जीवन कृतार्थ करेल !

लहानपण देगा देवा

          संत तुकाराम महाराजानी आपल्या अभंगाद्वारे लहानपणाचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे . हत्ती होऊन अंकुशाचा मार सहन करण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणे कितीतरी श्रेष्ठ आहे . लहानपण हे सर्वच दृष्टीनी श्रेष्ठ होय . बालपणीच्या आठवणी कितीतरी रम्य असतात . ना कसली चिंता , ना कसली काळजी ! खुशाल खावे , प्यावे व मजा करावी . उलट मोठ्या माणसाच्या काळज्या मारुतीच्या शेपटाप्रमाणे सतत लांबत राहतात . पण लहानाचे तसे नाही . म्हणूनच ’ रम्य ते बालपण ’ असे म्हटले आहे .

 

पेरावे तसे उगवते

          हा निसर्गातील नियम आहे . ज्याप्रमाणे आपण पेरतो त्याप्रमाणे उगवते ( As you sow , you reap) या आंग्ल वचनातही हाच अर्थ आहे . आपण जीवनात ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे त्याचे फळ आपणास मिळते .

          महाभारतातील कौरव - पांडव या दोन पक्षांचा विचार केला तर कौरव हे पहिल्यापासून असतब पक्षाला धरून वागले . त्यांचा पक्ष हा अन्यायाचा होता . ज्या गादीवर पांडवांचा हक्क ; त्या पांडवांना सुईच्या अग्रावर मावेल एवढीदेखील जमीन द्यावयाची नाही ही कौरवाची प्रतिज्ञा मोठी अन्यायकारक आणि चमत्कारिक अशी आहे. याउलट पांडवांनी न्याय्य बाजू असतानाही अनेक हालअपेष्टा सहन केल्या . दुःखाचे कढ त्यांनी मुकाटपणे भोगले . अज्ञातवासातील काळ घालवताना त्यांना कोण यातना झाल्या असतील ! पण शेवटी भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने त्यांना ’ सत्यमेव जयते ’ या वचनाचा साक्षात्कार झाला . जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राविषयी माणसाने खरे पाहिले तर निराश होण्याचे कारण नाही . कारण कोणत्याही क्षेत्रात जे आपण कष्ट करतो , त्याचे फळ आपणास मिळते . मग भले ते कष्ट शेतात करावयाचे असो वा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करावयाचे असोत . नावडत्या आईने आपला अपमान केला , आपणास बसावयास हक्काची जागा नाही , याची जाणीव झाल्यावर ध्रुवबाळ काही रडत बसला नाही . तर त्याने तपश्चर्या केली आणि अटळ असं स्थान प्राप्त करून घेतले . कष्ट केले की त्याचे फळ हे मिळते . 

यत्न तो देव जाणावा ( प्रयत्नांती परमेश्वर)

          परमेश्वराला लोकांनी अनेक नांवे दिलेली आहेत . संतांनी त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे . म्हणून ’ प्रयलांती परमेश्वर ’ असे म्हणतात . प्रयल करून देव मिळविणे म्हणजे यश मिळविणे . विद्यार्थ्यांनी सतत परिश्रम केले की त्याला यशरूपी देव भेटतो . पूर्वीच्या राजे लोकांनी प्रयल केले म्हणून मोठाली राज्ये स्थापन झाली .

          माणसाने आपला यत्नरूपी यज्ञ सतत पेटता ठेवला पाहिजे . देशभक्तांनी असाच यत्न केला . आपल्या प्राणांची आहुती दिली . सावरकरांनी धाडस केले . शारीरिक श्रम सहन केले . काळया पाण्याची शिक्षा सहन केली . गांधीजींनी सत्याग्रह केला . या यत्नरूपी यज्ञातूनच स्वातंत्र्याची पहाट उगवली . वानरांच्या साहाय्याने रामाने रावणाचा पराभव केला . एखादा शिल्पकार आपली लेणी वर्षानुवर्षे प्रयल करून खोदत असतो , मग त्याला देवपण येते ‘प्रयले वाळूचे कण रगडिता तेलही गळे ’ असे म्हणतात . प्रयलाने अशक्य गोष्टी शक्य होतात . आजवरचा मानवाचा इतिहास पाहिला की त्याची प्रचीती येते . प्रयल करून माणसाने हे जग सुंदर केले . त्याला स्वर्गाचे स्वरूप प्राप्त झाले . नद्यांची वळणे बदलली , अज्ञात भूमीचा शोध घेतला , डोंगर कपारीतून रस्ते काढले , अशी किती उदाहरणे सांगावीत ! 

          सर्वसामान्य माणूस आज देवाला दोष देतो , आपले अपयश झाकतो , याचे कारण  त्याने प्रयत्न , साधना केलेली नसते , म्हणून काहीतरी निमित्त आणि सबबी तो सांगतो . त्याने सतत यत्न केल्यास यशरूपी परमेश्वर त्याला भेटणारच !

अती तेथे माती

          कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा सत्यनाश झालाच समजा . अति सर्वत्र वर्जयेत . लहानपणी यशवंताची गोष्ट आपण वाचली . आईने आपल्या यशवंताच्या प्रत्येक गोष्टीचे लाड केले . त्याच्या चोरीवर पांघरूण घातले . तो मोठा गुन्हेगार झाला . खोटे बोलणे , पाप करणे यांचा अतिरेक झाला की त्याची फळे आपल्याला भोगावी लागतात .

          समाजातील काही प्रतिष्ठित लोकही याचा अतिरेक करतात . एकनाथांनी त्याची सुंदर उदाहरणे आपल्या गवळणीतून दिलेली आहेत .

          चंदन शीतल झाला म्हणून काय उगाळून प्यावा ?

          गावचा पाटील झाला म्हणून काय गाव बुडबाबा ?

 प्रीतीचा पाहुणा असला तरी लोकांच्या घरी जास्त राहू नये . भोदू संतांचे पाप चव्हाट्यावर आणताना एकनाथ म्हणतात,

देव अंगी आला म्हणून भलतेच बोलावे ?

किती साधी शिकवण त्यांनी दिली आहे ! अतिरेकाची पुराणातील पुष्कळ उदाहरणे सांगता येतील . दुर्योधन आणि रावण यांच्या पापाच्या अतिरेकामुळे त्यांचा नाश झाला . रोजच्या व्यवहारातही ते तत्त्व आपण पाळले पाहिजे . बोलणे , वागणे , खाणे , व्यसने यांच्यावर मर्यादा हवी , नाही तर विनाश ठरलेला आहे . अतिरेकाने माणूस पापमार्गाकडे जातो आणि विनाशात गुरफटून जातो . हा अतिरेक ऐश्वर्याचा असेल , व्यसनाचा असेल किया दुष्ट प्रवृत्तीचा असेल , म्हणून अतिरेक टाळला पाहिजे .

ग्रंथ हेच गुरू

माणसाचा पहिला गुरू म्हणजे त्याची माता . जगाच्या शाळेत तो अगदी कोरी पाटी घेऊन येतो . आई त्याला चालायला , बोलायला शिकविते . पुढे ज्ञानाचे अनेक नवे मार्ग आणि साधने उपलब्ध असतात . कोणतीही विद्या किंवा कला गुरूशिवाय प्राप्त होत नाही . 

मानवी गुरूशिवाय सर्व गुणांनी सिद्ध असलेला गुरू म्हणजे ग्रंथ . मानवी गुरुमध्ये लहरीपणा असतो , रागीटपणा असतो ; पण कोणतेही कारण न सांगता सदैव आपली सेवा करणारे गुरू म्हणजे ग्रंथ . 

 ग्रंथांच्या गुणवत्तेबद्दल आपल्याला कोणतीच शंका घेण्याचे कारण नाही . मोठेमोठे मानवी गुरू ग्रंथातूनच ज्ञान मिळवीत असतात . ग्रंथ हे मानवी गुरुप्रमाणे आपली चेष्टा करीत नाहीत , कधी फसवीत नाहीत , सदैव तत्पर असतात , आपले अंतरंग खुले करतात . आपणापासून काहीही लपवून ठेवत नाहीत . काही ग्रंथ सा?्या मानव जातीला सदैव समाधान देतात . भगवद्गीता , बायबल , कुराण है पवित्र ग्रंथ जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवितात.

 ग्रंथरूपी गुरुच्या सान्निध्यात ब्रह्मसुखाची प्राप्ती होते . मानवी गुरूकडून मिळणा?्या ज्ञानासाठी जबरदस्त फी मोजावी लागते , तशी ग्रंथगुरुसाठी लागत नाही . मानवी गुरू प्रमाणे ते भडकत नाहीत, त्यांच्याशी वाद घातला तरी ते तुमचे समाधान होईपर्यंत तुम्हाला मान देतील . तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता ज्ञानदानाचे पवित्र कार्य सदैव करणारे हेच म्हणजे थोर गुरूच आहेत . बसल्या जागी साऱ्या जगातील वर्तमान , भूतकाळ आणि भविष्यकाळ तुमच्यासमोर उभा करणा-या या गुरुला माझे विनम्र प्रणाम .

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण

           जीवनात या वचनाचा पुनः पुन्हा आपणास अनुभव येतो . माणसाला मिळालेला मोठेपणा आपल्याला दिसतो , पण ते यश मिळविण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात . महात्मा गांधीजींचेच उदाहरण आपण घेतले तर , प्रथम त्याना समाजाकडून खूप विरोध झाला होता . पण स्वातंत्र्य  मिळविण्यासाठी त्यांनी स्वत : च्या प्राणाचीही पर्वा केली नव्हती . त्यांचे प्रयत्न पाहून सगळा भारत देश त्याच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांना ’ महात्मा ’ म्हणू लागला.अशा प्रकारचे कष्ट बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करताना घेतले होते . प्रथम त्यांना त्या समाजाकडून खूप विरोध झाला . नंतर मात्र त्यांच्या आनंदाश्रमाकरता लोकांनी लाखों  रुपयांची मदत केली . पण त्यांच्या सुरुवातीच्या यातना विसरता येणार नाहीत . म्हणूनच म्हणतात ना ‘ मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो ‘ मोठेपण हे अतिशय यातना सहन केल्यावरच मिळते.

 

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...