Wednesday, May 15, 2019

गाऊ त्यांना आरती

                                       
कवी परिचय : 




यशवंत दिनकर पेंढारकर (1899-1985) रविकिरण मंडळातील प्रमुख कवी होते. बडोदा संस्थानचे राजकवी. महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून सन्मान. स्फुट कविता, खंडकाव्य, महाकाव्य, लघुनिबंध इ. स्वरूपाचे लेखन. ‘यशोधन’, ‘यशोगंध’ हे कवितांचे संग्रह. ‘बंदिशाळा’, ‘जयन्मंगल’ इ. खंडकाव्ये आणि ‘छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य प्रसिद्ध आहे. कौटुंबिक व सामाजिक भावनांचा आविष्कार, गेयता, सुबोधता आणि शाश्वता जीवन मूल्यांचा पुरस्कार ही काव्यलेखनाची वैशिष्ट्ये. आपल्या काव्य गायनाने कविता महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचविली. 1950 साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.



मूल्य :  व्यक्तिमाहात्म्य
साहित्य प्रकार :  विभूतिगौरव
संदर्भ ग्रंथ :  यशोधन
मध्यवर्ती कल्पना : राष्ट्र व समाज यांच्यासाठी त्याग आणि बलिदान करणाèयांचा गुणगौरव या कवितेत केला आहे. ही कवितेत सैनिक, देशभक्त, द्रष्टे, समाजसेवक, संत यांचा गौरव केला आहे.

टीपा :
सौभद्र-अर्जुन व सुभद्रा यांचा पराक्रमी पुत्र अभिमन्यू.
मार्कंडेय-त्रेतायुगातील होऊन गेलेले एक ऋषी. ते अल्पायुषी होते. पुढे सप्तर्षींच्या आशीर्वादाने ते दीर्घायुषी झाले. त्यांनी लिहिलेले मार्कंडेय पुराण प्रसिद्ध आहे.



कवितेचा सारांश 
 महाराष्ट्र  कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांनी या कवितेतून राष्ट्र  व समाज यांच्यासाठी त्याग आणि बलिदान करणाऱ्यांचा गुणगौरव या कवितेत केला आहे. आपल्या भारत देशात अनेक थोर पुरुष जन्माला ओ. ज्यांनी अतिशय धैर्याने लढाईत भाग घेतला व आपल्या राष्ट्राचा उध्दार करण्यासाठी ज्यानी आपले कर्णाप्रमाणे बलिदान केले. त्यांची आरती गाऊया.  या ठिकाणी कवी यशवंत राष्ट्रासाठी बलिदान करणा-या सैनिकांची, समाजसेवकांची, लोकसेवकांची गौरव आरती करत आहेत. रणांगणात सर्वांपुढे राहून ज्यांनी देशासाठी प्राण दिले, त्यांना कर्णाप्रमाणे युद्धभूमीवर मरण आले. 
ज्यांच्या मार्गात केवळ अंधार होता.  सर्वत्र अंधकारमय गोंधळाची परिस्थिती असताना, शत्रूनी वेढलेले असताना,  संभ्रमावस्थेतील लोकांना ज्यांनी कृष्णापमाणे सारथी बनून मार्ग दाखविला त्या देशसेवकांची आरती गाऊया. 
ज्यांनी आपल्या स्वार्थी वृत्तीला मूरड घालून फक्त उपकार केले व ज्यांनी देश म्हणजेच माझे कुटूंब आहे. आप्तेष्ट आहेत असे ज्यांनी मानले. अनेकांनी आपला स्वार्थ सोडला. इतरांचे सुख पाहिले, त्यांचे नातेवाईक म्हणजे देशातले लोक, अशा लोकांची आपण आरती गाईली पाहिजेत असे कवी म्हणतो.
 देश हाच देव, समाजाची दास्यातून मुक्ती हे ज्यांचे ध्येय. तो आपला धर्म मानून गुलामगिरी नष्ट करण्यासाठी प्रयत्न  करतात आणि मार्कंडेयापमाणे काळावर विजय मिळवतात त्यांचाही गौरव झाला पाहिजे असे कवीला वाटते. 

 आपल्या कुटुंबाची तमा न बाळगता काही लोकसेवा करतात व लोकसेवा करताना त्यांनी देहाची कधी पर्वा केली नाही आणि रणांगणावर जे  लढून प्राण गमावतात अभिमन्यूपमाणे बलिदान देतात त्यांचीही आरती गाऊया.  दिशाहिन बनलेल्या लोकांची मने स्वच्छ करून दिशा दाखवण्याचे काम काही लोकांनी केले. त्यांचे कार्य म्हणजे कोटी-कोटी दीप लावल्यासारखे आहे. त्या सर्वांची आपण आरती गायली पाहिजे असे कवी म्हणतो.
आपल्या हातून चांगले काही कार्य घडले नाही की आपल्याला मिळालेल्या या जन्माला काही अर्थ नाही. हा विचार आमच्या सर्वांच्या मनात येऊ दे व थोडीतरी सत्कृती या देशासाठी घडू दे अशी इच्छा कवीनी शेवटी व्यक्त केली आहे.  आपल्या जीवनाचे ध्येय काय असे मनाला आपण विचारतो तेव्हा कवी म्हणतात बाबा, तुझ्या हातून एवढे तरी चांगले काम होऊ ते की या लोकांना निदान गौरव तरी कर.

प्र .१  - एका वाक्यात उत्तरे द्या. 

1) देशभक्तांचा धर्म कोणता? 
उत्तर :देशाची सेवा हाच खरा धर्म होय.

2) समाजसेवकांचे ध्येय कोणते 
उत्तर : गुलामगिरीतून लोकांना मुक्त करणे हे समाजसेवकांचे ध्येय आहे.

३) कोणत्या हेतूला त्यांनी संक्षेप दिला? 
उत्तर : देशभक्तांनी स्वार्थ हेतूला संक्षेप दिला आहे.

४) देशभक्तांचा देव कोणता? 
उत्तर : देशभक्तांचा देव देश आहे.

५)  समाजसेवकांचे ध्येय कोणते? 
उत्तर : समाजाला दास्यातून मुक्त करणे हे त्यांचे ध्येय होय.

६)  लोकसेवेत मग्न असणान्यांना कोणती पर्वा  वाटत नाही? 
उत्तर : लोकसेवेत मग्न असणा-यांना स्वत:च्या जीवाची पर्वा वाटत नाही.


प्र. २ : रिकाम्या जागी योग्य हो शब्द लिहा. 


१) राष्ट्र चक्रोधारणी कर्णापरी ज्यांना ---

२) संभ्रमी त्या जाहले --- जे सारथी,

३) आणि ---- जे जिंकती काळाप्रती.

४) जाहल्या दिङमढ़ लोका ---- जे लोचने

५) बांधितो की एवढी तरी ते -----

उत्तरे : १) मृती, २) कृष्णापरी, ३) मार्कंडेयसे, ४) अर्पिती, ५) सत्कृती.

प्र. ३ :   योग्य पर्याय निवडून लिहा. 

१) महाराष्ट कवी असे कोणाला म्हटले जाते. 
अ) ग. दि. माडगूळकर, ब) आरती प्रभू, क) संत तुकडोजी महाराज, ड) मनोहर, ई) यशवंत
.
२) कवी यशवंत यांच्या महाकाव्याचे नाव --- ---- होय. 
अ) शंभूराजे, ब) रामराजा, क) भक्त प्रल्हाद, ड) छत्रपती शिवराय.

३) बडोदा संस्थांनचे राजकवी------- 
अ) केशवसूत ब) बालकवी  क) मनमोहन  ड) यशवंत.

४) गाऊ त्यांना आरती या कवितेचे मूल्य--  
अ) प्रेम, ब) मातृमहीमा, क) व्यक्तीमहात्म्य, ड) शौर्य,

उत्तरे : १)-ड) यशवंत, २)-ड) छत्रपती शिवराय, ३)-ड) यशवंत, ४)-क) व्यक्ती महात्म्य.

प्र. ४ : तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा. 

१) कर्णाप्रमाणे बलीदान कोण देतो? का? 
उत्तर : युद्धात लढाईकरण्यासाठीच ज्यांचा जन्म झाला आहे. अशा अनेक कर्णासारख्या वीरांनी बलीदान केले आहे. कारण भारताला पारतंत्र्यातून त्यांना मुक्त करायचे होते.

२) समाजसेवक कोणत्या भावनेने सेवा करतात? 
उत्तर : समाजसेवक आपला देश म्हणजे देव असे समजतात. देशातील प्रत्येकाला शांती मिळावी व देश गुलामगिरीतून मुक्त व्हावा या भावनेने सेवा करतात.

३) परार्थीचा आप्तविस्तार कसा असतो?
 उत्तर : भारतातील थोर पुरषांनी स्वत:च्या फायद्याचा कधीच विचार केला नव्हता. वैयक्तिक जीवनात त्यांनी स्वत:पेक्षा देशहिताचा विचार केला होता. त्यांचे नातेवाईक म्हणजे देशातील लोक.

४) दिङ्मूढ लोकांना कोण दिशा दाखवतात? कसे?
उत्तर : दिशाहिन झालेल्या लोकांना ज्ञानरूपी तेजाने समाजसुधारकांनी दिशा दिली. योग्य, अयोग्य यातील फरक सांगून लोकांना ज्ञानाची दिशा दिली.

५) समाजसेवक कोणत्या भावनेने सेवा करतात? 
उत्तर : समाजेसवक हे अपाला देव म्हणजे देश व धर्म म्हणजे दास्य (सेवक) असे समजून देशातील पत्येकाला शांती मिळावी व सर्व लोक गुलामगिरीतून मुक्त व्हावेत यासाठी स्वत:ची काळजी न करता सेवा करतात.

६) कवितेच्या शेवटी कविने कोणती इच्छा  व्यक्त केली? 
उत्तर : आपल्या हातून चांगले काही घडले नाही की, आपल्याला मिळालेल्या या जन्माला काही अर्थ नाही हा विचार आमच्या सर्वांच्या मनात येऊ दे व थोडीतरी सत्कृती या देशासाठी घडू दे अशी इच्छा कवीनी शेवटी व्यक्त केली आहे. 

प्र. ५ : सात-आठ वाक्यात उत्तरे लिहा. 

1) कवी कोणाकोणाचे गुणगान करू इच्छितो? का? 
उत्तर : गाऊ त्यांना आरती या कवितेत कवी राष्ट— व समाज यांच्यासाठी त्याग व बलिदान करणाया सर्वांचे गुणगाण करू इच्छितो. राष्ट—ाचा उध्दार करण्यासाठी जे कोणी कर्णापमाणे लढले, सर्वत्र अंधकारमय परिस्थिती असताना ज्यांनी कृष्णापमाणे मार्गदर्शन केले, ज्यांनी स्वत:च्या स्वार्थहेतू बाजूला ठेऊन परोपकार केला, ज्यांनी देशातील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी काळावर विजय मिळविला, आपल्या जिवाची पर्वा न करता लोकसेवा केली, ज्यांनी पखर दिव्यापमाणे लोकांना नवा मार्ग दाखविला. त्या सर्वांचे कवी गुणगान करू इच्छितो.

२) मार्कडेयाची तुलना कवीने देशभक्तांशी का केली आहे? 
उत्तर : कारण मार्कंडेयाने मृत्यूवर विजय मिळवला होता. खरे तर ते अल्पायुषी होते. पण भगवंत कृपेने ते दीर्घायुषी बनले. त्याप्रमाणे आपले सैनिकसुद्धा युद्धभूमीवर मरण पत्करून ते अमर झाले म्हणजेच ते मृत्यूवर विजय मिळवणारे ठरले.

प्र. ६ : संदर्भासहीत स्पष्टीकरण करा. 

१) संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी. 
उत्तर : वरील ओळ गाऊ त्यांना आरती या कवितेतून निवडली असून, कवी यशवंतांच्या 'यशोधन' या संग्रहातून ही कविता निवडली आहे. व्यक्तीमहात्म्य हे कवितेचे मूल्य आहे. देशभक्त, समाजसुधारक द्रष्टे यांचे गुणगान जणू आरती करून कवी करत आहेत. देशात जेव्हा अस्थिरतेचे, गोंधळाचे अशांततचे वातावरण असते तेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णाने गीतामृत सांगून संभ्रमातून दूर केले तसे देशभक्त लोकांना मार्गदर्शन करतात.

_________________________________________________________________________

यशवंत  -  महाराष्ट्रकवी 





यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. 'महाराष्ट्रकवी' म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते.

आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. "रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे.


बालपण

यशवंत ऊर्फ यशवंत दिनकर पेण्ढरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यात चाफळ येथे ९ मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बालपण तेथेच. आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची श्रद्धास्थाने. संस्कारक्षम वयात डॉ. दत्तोपंत पटवर्धन यांची लोकमान्य टिळकांची युयुत्सू राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांना स्फूर्तिप्रद वाटायची. ""छंद लागला टिटवीला । तिने समुद्रहि आटविला हे शब्द त्यांच्या अंतःकरणावर कोरलेले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंतीत्युत्सवाचा संस्कार त्यांच्यावर झालेला. तेव्हापासून त्यांच्या भावविश्‍वात समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले.

यशवंतांच्या लौकिक जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर होता. शालेय शिक्षणास ते सांगलीला राहिले. तेथील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही. त्यातही जमेची बाब ही की त्या शाळेतील शिक्षक, नामवंत कवी आणि कादंबरीकार साधुदास ऊर्फ गो. गो. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यशवंतांवर पडला.

पुणे वास्तव्य आणि साहित्यिक सहवास 

पुढे यशवंत पुण्याला गेले. अभिरुचिसंपन्न कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले. प्रा. श्री. बा. रानडे आणि सौ. मनोरमा श्रीधर रानडे या प्रेमळ दांपत्याची पाखर त्यांना लाभली. मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जिजी होती. माधव जूलियन यांच्यासारख्या व्युत्पन्न, प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला. दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते. शिवाय वि. द. घाटे, प्रा. द. ल. गोखले आणि ग. त्र्यं. माडखोलकर होते. या समानधर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले. औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाने भरून काढली. एकीकडे लौकिक जीवनातील वैशाखवणवा होता, तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते. अशा संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही. त्याविषयीची मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात, ""कारकुनी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राखरांगोळीच! अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवून जायचे. पण वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली. काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.

स्थायीभाव 

उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव आजच्या गतिमान जीवनप्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणारे नाही. पण, एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा जनमानसावर उमटवली होती. एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्‍वत जीवनमूल्यांचा त्यांनी उद्‌घोष केला. त्यांची कुंटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांतून प्रकट होते. १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या "आई' या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे.

"आई' म्हणोनि कोणी, आईस हाक मारी

ती हाक येई कानी, मज होय शोककारी

स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी

या ओळींतील आर्तता आणि करुणा अंतःकरणाला स्पर्श करते. मातेची महत्ता समुचित शब्दांत कवीने वर्णिलेली आहे.

आई! तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचे

माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे

"दैवतें माय-तात' या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञताभाव परिणामकारक शब्दांत व्यक्त झाला आहे. आपल्या मनातील भाव-भावनांचे कढ, आशा-निराशेची स्पंदने आणि तीव्र दुःखाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या. "समर्थांच्या पायांशी', "माण्डवी' व "बाळपण' अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. "लाह्या-फुले' या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो. माझें हें जीवित तापली कढई मज माझेंपण दिसेचि ना माझें जीवित तापली कढई तींत जीव होई लाही-लाही वसन्त, हेमन्त, निशा किंवा उषा लाहीच्या विकासासारखेंच लाह्या-फुलें ऐशीं देहीं फुलतात. ऐश्‍वर्य अनन्त हेंच आम्हां!

प्रेम कविता

यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. "प्रीतिसंगम', "प्रेमाची दौलत', "चमेलीचे झेले' आणि "एक कहाणी' या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. "एक कहाणी' मध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे. "चमेलीचे झेले'मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. "एका वर्षानंतर' या कवितेत सुरवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते... ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी मम सौख्यांची झाली होती तुझ्यांत साठवणी! या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्‍यामुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्‌गारतो... सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी! समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!

सामाजिक आशयाची कविता 

यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कविमनाचा विकास होत गेला. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वांतत्र्यांचा ध्यास घेतला. ""आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन. पण स्वातंत्र्यलक्ष्मी, तुझ्या चरणांशी लीन होईन. (स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा/यशोधन) ""स्वातंत्र्यभानूने भारतात लवकर दर्शन द्यावे. तेव्हाच आपण पावन होऊ. असे ते उद्‌गारतात. (तुरुंगाच्या दारात/यशोधन) "तुटलेल्या तारा' या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे दर्शन घडते. "सिंहाची मुलाखत' या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोन्ही मूल्यांचा पुरस्कार ते करतात. "गुलामाचे गाऱ्हाणे' आणि "इशारा' या प्रतिकात्मक आशय करणाऱ्या कविता आहेत. राष्ट्रजीवनातील पुरूषार्थाला जाग आलेली आहे, तिचे प्रतिबिंब या कवितांत आढळते. "तुरुंगाच्या दारात' या कवितेत कवी उद्‌गारतो... वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती मन्मना नाही क्षिती भिंतिच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी? मुक्त तो रात्रंदिनी

शृंखला पायात माझ्या चालताना रुमझुमे

घोष मंत्रांचा गमे या ओळीतून आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी दर्शन घडते. "मायभूमीस अखेरचे वंदन' या कवितेत मृत्यूवर मात करणारी वृत्ती दिसून येते.

जीवनाचे विविध पैलू यशंवतांनी आपल्या कवितेतून आकळले. त्यांची कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. "बंदीशाळा' हे बालगुन्हेगांरांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. "काव्यकिरीट' हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणविषयावरील खंडकाव्य आहे. "जयमंगला' मधील २२ भावगीतांमधून यशवंतांनी हृदयसंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हटले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवन त्यांनी "छत्रपती शिवराय' हे महाकाव्य रचले. "मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे. "मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह आहे. यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे.

गद्यलेखन
यशवंतांनी लिहिलेली ’घायाळ’ ही कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वार्इंग यांच्या The Failing Heart या कथेचे (दीर्घकथेचे) रूपांतर आहे.

यशवंतांनी या पुस्तकाला मोठी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी स्टीफन झ्वार्इंग यांची प्राथमिक माहिती, मराठीत झालेले त्यांचे अनुवाद, मराठी साहित्यिकांना वाटत असलेले झ्वार्इंग यांचे महत्त्व इत्यादी विस्तृत टिप्पणी केली आहे.

शेवटी यशवंतांनी झ्वार्इंग यांच्या सपत्‍नीक आत्महत्येचा तपशील सांगितला आहे, तो असा - झ्वार्इंग यांनी महायुद्धाने समग्र भूगोलाची आणि मानवी संस्कृतिविजयाची राखरांगोळी होणार हे पाहून, कल्पनाचक्षूंना दिसणारे जगाचे भेसूर भवितव्य न सहन होऊन २३ फेब्रुवारी १९४२ रोजी पत्‍नीसह आत्महत्या केली. 


यशोधन कवितासंग्रह 
घायाळ अनुवादित कादंबरी 

१९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
000000000000000000000000


यशवंत : (९ मार्च १८९९–२६ नोव्हेंबर १९८५). 

विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढरकर. जन्म सातारा जिल्ह्यातील चाफळचा. शिक्षण सांगलीस झाले. मॅट्रिक झाल्यानंतर पुण्यास लेखनिकाची नोकरी केली. कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) ह्यांचे काव्यरचनेसंबंधीचे मार्गदर्शन आरंभीच्या काळात त्यांना मिळाले. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहिण्याकडे होती. पुढे ⇨रविकिरणमंडळात ते आल्यानंतर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. यशोधन (१९२९) हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय कवितासंग्रह. त्यानंतरचे त्यांचे यशोगन्ध (१९३४), यशोनिधि (१९४१), यशोगिरी (१९४४), ओजस्विनी (१९४६) इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गेय, भावोत्कट, सामान्यांच्या सुखदुःखांशी समरस होणारी, सहजसुगम अशी त्यांची कविता आहे. त्यामुळे रविकिरणमंडळातील सर्वांपेक्षा अधिक लोकप्रियता त्यांना मिळाली. स्फुट कवितेबरोबर जयमङ्‌गला (एक प्रेमकथा) (१९३१), बन्दीशाळा (१९३२), काव्यकिरीट (१९४१) अशी दीर्घ काव्यरचनाही त्यांनी केली. बन्दीशाळेत बालगुन्हेगाराची जीवनकथा सांगितलेली आहे, तर जयमङ्‌गला म्हणजे कवी बिल्हणाची प्रेमकथा होय. २२ भावगीतांचे मिळून हे एक काव्य झालेले असून रचनादृष्ट्या यशवंतांनी केलेला हा एक वेगळाच प्रयोग होय. काव्यकिरीटात बडोद्याचे अधिपती प्रतापसिंह महाराज ह्यांच्या राज्याभिषेकोत्सवाचे वर्णन आहे. त्या काव्याने ते बडोदे संस्थानचे राजकवी झाले. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ‘महाराष्ट्र-कवी’ म्हणून गौरविण्यात आले. लहान मुलांसाठी त्यांनी काही काव्यरचना केली आहे. तसेच छत्रपती शिवराय (१९६८) हे त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेले महाकाव्यही प्रसिद्ध आहे. यशवंतांनी काही गद्यलेखन केले असले, तरी मुख्यत: कवी म्हणूनच ते विशेष मान्यता पावले आहेत. पुणे येथे ते निधन पावले.




No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024