Sunday, May 19, 2019

चिंगी महिन्याची झाली नाही तोच


लेखक परिचय : 

दिवाकर म्हणजेच शंकर काशीनाथ गर्गे (1889-1931) नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत आणणारे हे पहिले लेखक होत. ते पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षक होते. त्यांचे शिक्षण स्कूल फायनलपर्यंत झाले. तथापि प्रो.वासुदेवराव पटवर्धन यांच्याजवळ त्यांनी इंग्लिश नाट्यछटा लेखकांच्या ग्रंथाचे सूक्ष्म अध्ययन केले व नाट्यछटा लिहिल्या. तात्यासाहेब केळकरांना त्यांच्या नाट्यछटा आवडल्या. त्यांनी त्यापैकी काही नाट्यछटा केसरी या वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्या. नाट्यछटा लिहिताना दिवाकर एकेक शब्द किंवा विराम देखील श्रोत्यांच्या मनावर काय परिणाम करील याची चिकित्सा करून मगच लिहित असत.

ही नाट्यछटा युट्यूब वर पाहण्यासाठी इथे क्लिक करा CLICK ME


मूल्य : वात्सल्य
साहित्य प्रकार : नाट्यछटा
संदर्भ ग्रंथ : दिवाकरांची नाट्यछटा
मध्यवर्ती कल्पना: या नाट्यछटेत बोलणारे पात्र एकच ते म्हणजे चिंगीची आई ! चिंगी एक महिन्याची झाली नाही तोच ही आई मनोराज्य करीत आहे. ती चिंगीशी बोलते आहे म्हणण्यापेक्षा चिंगीबद्दल मनाशी बोलते आहे असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल.

टीपा

नाट्यछटा - हा साहित्यप्रकार दिवाकरांनी मराठीत प्रथम आणला. नाट्यछटेत एकच पात्र असते. नाटकाप्रमाणे पात्रे अधिक नसतात. नाट्यछटेत एकच पात्र ते कधी मनाशी बोलते तर कधी ते इतरांशी बोलते. ऐकणारे या पात्रांच्या प्रश्नांना उत्तरे देतात असे समजून हे पात्र आपले बोलणे पुढे चालू ठेवते.

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

1. चिंगी रंगाने कशी आहे?
उत्तर :  काळीआहे.

2. चिंगी कसली बुकं वाचील?
उत्तर : चिंगी मोठी मोठी बुकं वाचील.

3. चिंगीची आई किती हुंडा देणार आहे?
उत्तर : चिंगीची आई हजार रुपये हुंडा देणार आहे.

4. मोठी दैवाची कोण आहे?
उत्तर : चिंगी मोठी दैवाची आहे.

5. कोणाचा जंजाळ नको आहे?
उत्तर : मुलींचा जंजाळ नको आहे.

प्र. 2.  खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा.

1. चिंगीची आई चिंगीला कोणते दागिने करायचे असे म्हणते?
उत्तर : चिंगीची आई चिंगीला सरी, बिंदल्या, वाळे, साखळ्या व इतर सगळे दागिने करायचे म्हणते.

2. चिंगीला कसा नवरा मिळणार आहे?
उत्तर : चिंगीला गोरा छाप नक्षत्रासारखा अगदी चित्रासारखा नवरा मिळणार आहे.

3. चिंगीच्या लग्नाची वरात कशी निघणार आहे?
उत्तर : चिंगीच्या लग्नाची वरात अगदी थाटात निघणार आहे. आई चिंगीच्या लग्नात ताशे, वाजंत्री, चौघडा तसेच बेंडबाज्यासुद्धा लावणार आहे. वरातीत नळे चंद्रज्योती झाडे यांचा लकलकाट होणार आहे.

4. चिंगीला मुलेच व्हावीत असे चिंगीच्या आईला का वाटते?
उत्तर : चिंगीला मुलेच व्हावीत असे चिंगीच्या आईला वाटते कारण मुली म्हणजे तिला जंजाळ (कटकट) वाटतो.

5. चिंगी रडू का लागते?
उत्तर : आई चिंगीला रागावतेे, बोलू नकोस कार्टे माझ्याशी म्हणून तिचा गालगुच्चा घेते. त्यामुळे चिंगी रडू लागते.

प्र. 3. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी चार ते पाच वाक्यात लिहा.

1. चिंगीची आई चिंगीचे लग्न कशाप्रकारे करणार आहे?
उत्तर : चिंगीची आई चिंगीचे लग्न अगदी थाटामाटात करणार आहे. तिला गोरा छाप नक्षत्रासारखा अगदी चित्रासारखा नवरा मिळणार आहे. आई चिंगीच्या लग्नात हजार रुपये हुंडा देणार आहे. शिवाय तिच्या लग्नात ताशे, वाजंत्री, चौघडा तसेच बेंडबाज्यासुद्धा लावणार आहे. वरात सुद्धा काढणार आहे. या वरातीत नळे चंद्रज्योती झाडे यांचा लकलकाट होणार आहे.
2. चिंगीचा संसार कसा व्हावा असे तिच्या आईला वाटते?
उत्तर : चिंगीचा संसार सुखाचा झाला पाहिजे असे तिच्या आईला वाटते. चिंगीने आपल्या नवèयाला मुठीत ठेवावे असेही तिला वाटते. तिचं पहिलं बाळंतपण इथंच व्हायला हवं तसेच तिला सारे मुलगेच  व्हावेत असं तिला वाटतं. (कारण मुली म्हणजे तिला कटकट वाटते.) संसारात तिला गाडी, घोडे, कपडा लत्ता कशाकशाला कमी पडू नये असंही तिला वाटतं.

प्र. 4. खालील प्रश्नाचे उत्तर सात ते आठ वाक्यात लिहा.

1. चिंगी एक महिन्याची झाली नाही तोच तिची आई मनाशी काय काय ठरविते?
उत्तर : चिंगी एक महिन्याची झाली नाही तोच तिच्या आईने मनाशी अनेक गोष्टी ठरविल्या आहेत. चिंगीला सरी, बिंदल्या, वाळे, साखळ्या व इतर सगळे दागिने करायचे असे ती म्हणते. तिला छानसा परकर नेसायचा, पोलके घालायचे अन् ठुमकत ठुमकत तिला शाळेला पाठवायचे ठरविते. शाळेत गेल्यावर माझी बबी शहाणी होईल तिथं मोठी मोठी बुकं वाचील अन मग तिचं लग्न होईल. तिला गोरा छाप नक्षत्रासारखा अगदी चित्रासारखा नवरा मिळेल असं तिला वाटते. आईने चिंगीच्या लग्नात हजार रुपये हुंडा देण्याचे ठरविले आहे. शिवाय चिंगीच्या लग्नात ताशे, वाजंत्री, चौघडा तसेच बेंडबाज्यासुद्धा लावणार आहे. वरातीत नळे चंद्रज्योती झाडे यांचा लकलकाट होईल असे ती म्हणते. चिंगीला मुलेच व्हावीत असे आईला वाटते कारण मुली म्हणजे तिला कारट्यांचा जंजाळ (कटकट) वाटतो. तिचा संसार सुखाचा व्हावा असे तिला वाटते. संसारात तिला गाडी, घोडे, कपडा लत्ता कशाकशाला कमी पडू नये असं तिला वाटतं.

प्र. 5. खालील वाक्यांचे संदर्भासहीत स्पष्टीकरण करा.


1. ‘शहाणी होईल बबी माझी’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य दिवाकर ऊर्फ शंकर काशीनाथ गर्गे लिखित ‘चिंगी महिन्याची झाली नाही तोच’ या नाट्यछटेतील आहे. चिंगीला तिच्या आईने उद्देशून असे म्हटले आहे.
स्पष्टीकरण : चिंगी महिन्याची झाली नाही तोच तिच्या आईने अनेक योजना मनाशी ठरविल्या आहेत. त्या ती चिंगीला सांगत आहे.  चिंगी छानसा परकर नेसून, पोलके घालून ठुमकत ठुमकत शाळेला जाईल अन तिथे माझी बबी  शहाणी होईल असं चिंगीच्या आईला वाटते.

2. ‘माणसाला कसं मुठीत ठेवायला हवे बरं का!’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘चिंगी महिन्याची झाली नाही तोच’ या नाट्यछटेतील आहे. तिचे लेखक दिवाकर ऊर्फ शंकर काशीनाथ गर्गे आहेत. चिंगीला तिच्या आईने उद्देशून असं म्हटले आहे.
स्पष्टीकरण : चिंगीने लग्न झाल्यावर भांडू नये असे तिच्या आईला वाटते. संसार सुखाचा करावा असं ती चिंगीला दटावीत आहे. संसार चांगला  होण्यासाठी चिंगीने आपल्या नवèयाला (माणसाला) मुठीत ठेवलं पाहिजे असंही चिंगीच्या आईला वाटते. तसं ती चिंगीला बजावते.

3. ‘नाय नाय..... उगी, उगी, माझी बाय ती!’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य दिवाकर ऊर्फ शंकर काशीनाथ गर्गे लिखित ‘चिंगी महिन्याची झाली नाही तोच’ या नाट्यछटेतील आहे. चिंगीला तिच्या आईने उद्देशून म्हटले आहे.
स्पष्टीकरण : चिंगी महिन्याची झाली नाही तोच तिच्या आईने आपल्या मनाशी काय ठरविलं आहे ते ती चिंगीला सांगत आहे. ते सारे ऐकून चिंगी दिमाख दाखवते आहे, फुगते आहे असे तिला वाटते त्यामुळे आई कार्टे बोलू नकोस माझ्याशी म्हणून तिचा गालगुच्चा घेते. मी एकटीच बोलत आहे अन तू आपली ..... असं म्हटल्यावर चिंगी रडायला लागते. त्यावेळी आई तिची समजूत काढताना म्हणते नाय नाय..... उगी, उगी, माझी बाय ती.

प्र. 6.   योग्य पर्याय निवडून लिहा.

1. चिंगी रंगाने कशी आहे?
अ) सावळी ब) गोरी क) काळी ड) केतकी

2. शंकर काशीनाथ गर्गे यांचे टोपणनाव कोणते?
अ) माधवानुज ब) केशवकुमार क) दिवाकर ड) बालकवी

3. चिंगीची आई चिंगीच्या लग्नात किती हुंडा देणार आहे?
अ) हजार ब) लाख क) पाचशे ड) शंभर

4. चिंगीला कशासारखा नवरा मिळणार आहे?
अ) राजपुत्र ब) नट क) नक्षत्र ड) चंद्र

5. ‘चिंगी महिन्याची झाली नाही तोच’ या पाठाचा साहित्यप्रकार कोणता?
अ) नाट्यछटा ब) नाटक क) एकांकिका ड) प्रहसन 

उत्तरे : 1. क)काळी  2. क) दिवाकर  3. अ) हजार 4. क) नक्षत्र  5. अ) नाट्यछटा  

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024