Thursday, May 23, 2019

कर्नाटकातील उद्योगधंदे



प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. कर्नाटकातील सर्वात प्रथम लोहपोलाद उद्योग ................ येथे स्थापन झाला.

2. कर्नाटकचे मँचेस्टर म्हणजे ................

3. उसापासून ................ चे उत्पादन होते.

4. अम्मसंद्रा मध्ये ................ हा उद्योग आहे

5. सिलीकॉन व्हॅली असे ................ या शहराला म्हणतात.

उत्तरे : 1. भद्रावती  2. दावणगेरे  3. साखर  4. सिमेंट  5. बेंगळूर

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


1. कर्नाटकातील कारखान्यांच्या अभिवृद्धीबद्दल माहिती लिहा.
उत्तर : कर्नाटकात उद्योगधंद्याच्या वाढीसाठी सर एम.विश्वेश्वरय्या यांचे योगदान मोलाचे आहे. औद्योगिकीकरण नसेल तर विनास या तत्त्वावर विश्वास ठेऊन त्यांनी आपल्या राज्यात अनेक उद्योगांचा पाया घातला. 2. 1902 मध्ये शिवनसमुद्र येथे जलविद्युत उत्पादन केंद्र सुरू झाल्यानंतर विविध मूलभूत व दैनंदिन गरजेच्या वस्तू तयार करणारे उद्योग अस्तित्वात आले. भातगिरण्या, फरशी बनविणारे कारखाने, बिडी, सिगारेट, लोखंड आणि पितळ भट्ट्या या उद्योगांची स्थापना झाली. 3. 1923 नंतर राज्यात लोखंड पोलाद कारखाने, साबणाचे कारखाने, रेशीम व सूतगिरण्या, कागद उद्योग, सिमेंट उद्योग, रंग, साखर, चंदन तेल उद्योग अशा अनेक उद्योगधंद्यांची स्थापना झाली. 4. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हैसूर प्रांतातील उद्योगांमुळे ते एक आदर्श राज्य बनले होते. याचे एक कारण म्हणजे ब्रिटिश आणि म्हैसूरच्या राजांनी उद्योगांच्याबाबतीत दाखविलेली आसक्ती होय. 5. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केंद्र सरकारचे औद्योगिक धोरण राज्यातील कारखान्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल होते. यामुळे अनेक उद्योगधंदे स्थापन झाले ते म्हणजे विमान कारखाना, इंजीनियरिंग उद्योग, मशीन टूल्स (एच.एम.टी., बेल, भेल), घड्याळ, लोखंड आणि पोलाद, अ‍ॅल्युमिनियम, माहिती व तंत्रज्ञान, विद्युत परमाणू (इलेक्ट्रॉनिक्स) आणि जैव तंत्रज्ञान उद्योग वगैरे.

2. कर्नाटकातील लोह पोलाद उद्योगांबद्दल विस्ताराने लिहा.
उत्तर : 1. कर्नाटक हे दक्षिण भारतात लोह पोलाद उद्योग प्रारंभ करणारे पहिले राज्य आहे. सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या दूरदृष्टीमुळे बाबा बुडनगिरी टेकड्यातील उत्तम आणि विपुल प्रमाणात मिळणाèया कच्च्या लोखंडाच्या साठ्यामुळे त्यांनी 1923 साली शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथे लोह पोलाद उद्योगाची स्थापना केली. 2. पूर्वी याला म्हैसूर आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड असे म्हणत होते. 1989 मध्ये स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडे याचे हस्तांतरण करण्यात आल्यानंतर तो कारखाना विश्वेश्वरय्या आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ओळखला जातो. 3. या उद्योगांसाठी आवश्यक असलेले कच्चे लोखंड केम्मनगुंडी येथून, चुनखडी बंडिगुड्डा येथून, पाणी भद्रा नदीतून तर मँगनीज सोंडूर येथून पुरविले जाते. प्रारंभी भट्टी पेटविण्यासाठी जळावू लाकडांचा वापर करत होते. शरावती येथे जलविद्युतनिर्मिती केंद्र सुरू झाल्यावर जलविद्युतशक्तीचा आता वापर केला जात आहे. सध्या येथून विशिष्ट प्रकारचे पोलाद, ओतीव लोखंडाचे (बिडाचे) उत्पादन केले जात आहे. 4. कर्नाटकातील आणखी एक प्रमुख लोह पोलाद उद्योग म्हणजे खासगी क्षेत्रातील जिंदाल विजयनगर स्टील लिमिटेड होय.  इ.स.2001 मध्ये अत्याधुनिक कोरेक्स तंत्रज्ञानाचा वापर करून बळ्ळारी जिल्ह्यातील तोरणगल येथे याची स्थापना झाली. येथे लोखंड व पोलादाचे उत्पादन केले जाते.

3. सुती वस्त्रोद्योगांच्या विभागणीबद्दल थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर : कापसापासून सरकी काढणे व कापूस पिंजण्याचा उद्योग (जिनींग मिल), कापसाच्या धाग्यापासून कापड विणण्याचा उद्योग (स्पिनींग मिल), उत्तरेकडील जिल्ह्यात सुरू झाले. सर्वात प्रथम इ.स. 1884 मध्ये गुलबर्गा येथे एम.एस. के. सूतगिरणी स्थापन झाली. त्यानंतर हुबळी येथे सुती वस्त्रोद्योग प्रारंभ झाला. इ.स. 1900 नंतर मोठ्या सुती वस्त्रोद्योगांची स्थापना झाली. त्यामध्ये बेंगळूरमधील बिन्नी मिल, मिनर्व्हा मिल, म्हैसूर येथील के.आर. मिल, दावणेगेरी येथील कॉटनमिल वगैरे उद्योगांची स्थापना स्वातंत्र्यपूर्वकालात झाली. स्वातंत्र्यानंतर उत्तरेकडील पठारी प्रदेशात जेथे कापूस मुबलक पिकतो तेथे सुती वस्त्रोद्योग स्थापन झाले. दावणगेरी हे राज्यातील अति महत्त्वाचे कापड उत्पादन केंद्र बनले. त्याला कर्नाटकचे मँचेस्टर म्हणतात. हुबळी, इलकल, गुळेदगुड्ड, रबकवी, बागलकोट, मणकालल्मूर, गदग-बेटगेरी, बदामी, बेळगाव, नरगुंद, गोकाक, बळ्ळारी, नंजनगुड, पेरियापट्टण, चामराजनगर येथेही कापूस पिंजण्याचे  आणि कापड विणण्याचे उद्योग स्थापित झाले आहेत. सध्या राज्यामध्ये 44 सुती वस्त्रोद्योग आहेत. तेथे वार्षिक सरासरी 5.1 दशलक्ष मीटर सुती कापडाचे उत्पादन होते.

4. साखर उद्योग सुरू करण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत ते सांगा.
उत्तर : साखर उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे ऊसाचे उत्पादन, उत्तम हवामान, विद्युत पुरवठा, स्थानिक बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था इ.

5. बेंगळूर शहरात माहिती व तंत्रज्ञान उद्योग केंद्रीत होण्याची कारणे कोणती ?
उत्तर : उत्तम हवामान, विद्युत पुरवठा, तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, अर्थसहाय्य, विस्तृत बाजारपेठा आणि मूलभूत सोयीसुविधांमुळे बेंगळूर हे भारतातील प्रतिष्ठीत, प्रगत माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास आले आहे.

प्रश्न 3 - जोड्या जुळवा

                                                            
            1.          दांडेली                          अ) सिमेंट
            2.         तोरणगल                      ब) सुतीवस्त्रे
            3.         मोळकाल्मूर                  क) कागद
            4.         शहाबाद                       ड) संगणक
            5.         इन्फोसिस                     इ) लोह आणि पोलाद

उत्तरे : -  1. क) कागद 2. इ) लोह आणि पोलाद  3. ब) सुतीवस्त्रे 4. अ) सिमेंट 5. ड) संगणक

------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024