Monday, May 13, 2019

अनंतशक्ति : परमेश्वरू


श्री चक्रधर स्वामी 

 लेखक परिचय :
केसोबास ऊर्फ केशिराज बास (तेरावे शतक) महानुभाव पंथातील हे ज्येष्ठ ग्रंथकार, संस्कृत पंडित. महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य. नागदेवाचार्य यांचे पट्टशिष्य. त्यांच्या सूचनेवरून केसोबास यांनी मराठीत ग्रंथरचना केली. पंथाचे तात्विक अधिष्ठान दृढ बनविण्यात त्यांचे योगदान असून, महानुभाव साहित्यात त्यांनी मोलाची भर टाकली आहे. ‘श्री चक्रधरोक्त सूत्रपाठ; ‘मूर्तिप्रकाश’, ‘लापणिक’, ‘दृष्टांतपाठ’, गुढे या त्यांच्या मराठीतील ग्रंथ रचना. तसेच ‘रत्नमालास्तोत्र’, ‘ज्ञानकलानिधीस्तोत्र’, ‘दृष्टांतस्तोत्र’ या संस्कृत रचना त्यांनी केल्या आहेत.
महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांनी लीळाचरित्रात दृष्टांत कथेच्या रूपात जो उपदेश केला. त्यातील दृष्टांताचे संकलन केसोबास यांनी 1285 च्या सुमारास ‘दृष्टांतपाठ’ या ग्रंथात केले. प्रथम सूत्र त्यानंतर दृष्टांत आणि शेवटी दार्ष्टांतिक असा या गं्रथातील रचनाक्रम आहे. दृष्टांतकथामुळे पंथातील गहन तत्त्वज्ञान सर्वसामान्यांसाठी सोपे झाले आहे.
या उताèयात परमेश्वर स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी समर्पक दृष्टांत दिला आहे. हा दृष्टांत डोमेग्राम येथे म्हाईंभटास सांगितला.

मूल्य :  ज्ञान, उत्सुकता
साहित्य प्रकार :  प्राचीन गद्य
संदर्भ ग्रंथ :  ‘महाराष्ट्र सारस्वत’  ले. विनायक लक्ष्मण भावे

टीपा : दार्ष्टांन्तिक म्हणजे दृष्टांताचे तात्पर्य किंवा सार.

प्रमाण मराठीत अर्थ : 

श्री चक्रधर स्वामी म्हणाले,
सूत्र : ‘‘ज्याचा जो अनुभव असेल तसा तो बोलतो. अनंत शक्तिमान असलेला परमेश्वर सगळ्यांसाठी विषयव्यवस्था करीत असतो.’’

दृष्टांत : गावात हत्ती आला असता त्याला पहायला जन्मांध लोक गेले. एकाने पाय पाहिला. एकाने सोंड पाहिली. एकाने कान पाहिला. एकाने पाठ पाहिली. एकाने पोट पाहिले. एकाने शेपूट पाहिले. मग ते एकमेकांना विचारू लागले, ‘अरे तू हत्ती पाहिला. तर तो कसा आहे?’ ज्यांने पाय पाहिला त्याने म्हटले ‘हत्ती खांबासारखा!’ सोंड पाहिलेला म्हणाला, ‘मुसळासारखा’!, कान पाहिलेला म्हणाला, ‘हत्ती सुपासारखा!’ पाठ पाहिली होती तो म्हणाला, ‘हत्ती भिंतीसारखा!’ ज्यांने पोट पाहिले होते तो म्हणाला, ‘हत्ती कोथळ्यासारखा!’ शेपूट पाहणारा म्हणाला, ‘खराट्यासारखा!’ अशा रीतीने ते एकमेकांस विरोध करून आपलेच ते खरे म्हणत होते. त्यांच्यामध्ये एकजण डोळस होता. तो म्हणाला, ‘‘हा हत्तीचा एक एक अवयव झाला. हा सगळा हत्ती नव्हे. अशा सर्व अवयवांनी युक्त तो हत्ती होय.’’

दार्ष्टांन्तिक (तात्पर्य) : अशाप्रकारे ज्याला जी शक्ती प्रकाशली, (ज्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त झाले.) त्या शक्तीलाच तो परमेश्वर मानतो. ज्ञानी मनुष्य मात्र म्हणतो की ही परमेश्वराची एक एक शक्ती होय, पण परमेश्वर नव्हे. अशा सर्व शक्तींनी युक्त असा परमेश्वर असतो.

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 









स्वाध्याय   

प्र.1  खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 

1) हत्तीला पाहण्यासाठी कोण गेले ?
उत्तर : हत्तीला पाहण्यासाठी जन्मापासून आंधळे असलेले लोक गेले होते

2) सोंड पाहणाèयास हत्ती कसा वाटला?
उत्तर : सोंड पाहणाèयास हत्ती ‘मुसळा’सारखा वाटला.

3) शेपूट पाहणाèयास हत्ती कशासारखा वाटला?
उत्तर : शेपूट पाहणाèयास हत्ती ‘खराट्या’सारखा (झाडू) वाटला.

4) सर्वांसाठी विषयव्यवस्था कोण करतो?
उत्तर : सर्वांसाठी विषयव्यवस्था परमेश्वर करतो.

5) हत्ती सुपासारखा असे कोणत्या अंधाला वाटले?
उत्तर : कान पाहणाèया अंधाला हत्ती सुपासारखा आहे असे वाटले.

प्र.2 खालील ओळीतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

1) पाय पाहणाèया आंधळ्याला हत्ती ........... सारखा वाटला. (खांबा)
2) पोट पाहणाèयास हत्ती ........... सारखा भासला. (कोथळ्या)
3) हत्ती भिंतीसारखा असे ...........  पाहणारा म्हणाला. (पाठ)
4) सर्वज्ञ म्हणजे ........... होय. (चक्रधरस्वामी)
5) आंधळ्याला हत्तीचे खरे स्वरूप ........... ने समजावून सांगितले. (डोळसा)

प्र.3 खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा. 

1) डोळस मनुष्य आंधळ्यांना काय म्हणाला?
उत्तर : डोळस माणसांने त्या आंधळ्यांना हत्तीचे खरे स्वरूप समजावून सांगितले. तो म्हणाला, तुम्ही स्पर्श करून अनुभवला तो हत्तीचा एकेक अवयव झाला. हा संपूर्ण हत्ती नव्हे. अशा सर्व अवयवांनीयुक्त तो हत्ती होय.

2) या कथेचे तात्पर्य कोणते?
उत्तर : या कथेचे तात्पर्य म्हणजे ज्याला जी शक्ती प्रकाशली, त्या शक्तीलाच तो परमेश्वर मानतो. ज्ञानी मनुष्य मात्र म्हणतो की ही परमेश्वराची एक एक शक्ती होय, पण परमेश्वर नव्हे. अशा सर्व शक्तींनी युक्त असा परमेश्वर असतो.

3) आंधळ्यांनी हत्तीचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर : डोळ्यांनी पाहू शकत नसल्याने आंधळ्यांनी हत्ती स्पर्श करून पाहिला होता. स्पर्शाने त्यांना जे समजले तसे त्यांनी हत्तीचे वर्णन केले आहे. ज्यांने पाय पाहिला होता त्याने म्हटले हत्ती खांबासारखा आहे. सोंड पाहिलेला म्हणाला, ‘मुसळासारखा’ आहे. कान पाहिलेल्याला तो सुपासारखा वाटला. पाठ पाहिलेल्याला तो भिंतीसारखा वाटला. पोट पाहिलेल्याला   कोथळ्यासारखा!’ तर शेपूट पाहणाèयाला तो ‘खराट्यासारखा वाटला.

प्र.4  संदर्भासह स्पष्टीकरण करा.

1) ‘‘जात्यंध हस्तीतें पाहो गेले’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘अनंतशक्ती परमेश्वरू’ या पाठातील असून लेखक केसोबास उर्फ केशिराज बास आहेत. वि. ल. भावे यांच्या ‘महाराष्ट्र सारस्वत’ यातून हा उतारा घेतला आहे.
स्पष्टीकरण : परमेश्वर हा सर्वांची व्यवस्था करतो तो सर्वश्रेष्ठ आहे हे समजावून देण्यासाठी श्री चक्रधरस्वामींनी हत्ती व आंधळे यांचा दृष्टांत म्हाईंभटास सांगताना, गावात आलेला हत्ती पाहण्यासाठी जात्यंध लोक गेले होते असे म्हटले आहे.

2) ‘‘तो भणे हा हस्तीचा एकेकु अवयेवु होये’’
उत्तर : संदर्भ : वरील वाक्य ‘अनंतशक्ती परमेश्वरू’ या पाठातील असून लेखक केसोबास उर्फ केशिराज बास आहेत. वि. ल. भावे यांच्या ‘महाराष्ट्र सारस्वत’ या पुस्तकातून हा उतारा घेतला आहे.
स्पष्टीकरण : गावात आलेल्या हत्तीला पाहून त्याचे आंधळ्यांनी वर्णन केल्यानंतर त्यातील डोळस व्यक्ती हत्तीचे खरे स्वरूप समजावून देण्यासाठी त्या आंधळ्यांना म्हणतो, आपण पाहिला तो हत्तीचा एकेक अवयव आहे. संपूर्ण हत्ती नव्हे.

3) ‘‘अनंतशक्ती परमेश्वरु: सकळांसीही निश्चये व्यवस्था करिती’’
उत्तर :  संदर्भ : वरील वाक्य ‘अनंतशक्ती परमेश्वरू’ या पाठातील असून लेखक केसोबास उर्फ केशिराज बास आहेत. वि. ल. भावे यांच्या ‘महाराष्ट्र सारस्वत’ या पुस्तकातून हा उतारा घेतला आहे.
स्पष्टीकरण : आपल्याला आलेल्या अनुभवालाच खरी शक्ती आपण मानत असतो. परंतु सर्व शक्ती एकत्र येऊन बनलेला खरा शक्तीमान परमेश्वर वेगळाच असतो. तो सर्वांसाठी विषयव्यवस्था करीत असतो. असे या दृष्टांतातून चक्रधरस्वामींनी म्हाईंंभटास सांगितले आहे.

प्र.5  खालील प्रश्नाचे सात ते आठ ओळीत उत्तर लिहा.

1) या कथेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर : सारांश : महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी दृष्टांत कथेच्या रूपात डोमेग्राम येथे म्हाईंभटास जो उपदेश केला आहे. त्याचे संकलन नागदेवाचार्यांचे शिष्य केसोबास यांनी ‘दृष्टांतपाठ’ या ग्रंथात केले आहे.
सूत्र : ‘‘ज्याचा जो अनुभव असेल तसा तो बोलतो. अनंत शक्तिमान असलेला परमेश्वर सगळ्यांसाठी विषयव्यवस्था करीत असतो.’’
एका गावात हत्ती आला असता त्याला पहायला जन्मत:च आंधळे असलेले लोक गेले होते. त्यांच्याबरोबर एक डोळस माणूसही होता. ज्या अंधाने  पाय पाहिला. एकाने सोंड पाहिली. एकाने कान पाहिला. एकाने पाठ पाहिली. अंध असल्यामुळे त्यांनी हातानी स्पर्श करून हत्तीला पाहण्याचा प्रयत्न केला. एकाने पाय पाहिला. एकाने सोंड पाहिली. एकाने कान पाहिला. एकाने पाठ पाहिली. एकाने पोट पाहिले. एकाने शेपूट पाहिले. नंतर एकमेकांना ते आपण पाहिलेला हत्ती कसा आहे सांगू लागले, ‘अरे तू हत्ती पाहिलास  तो कसा आहे?’ ज्याने पाय पाहिला होता त्याने म्हटले, हत्ती खांबासारखा आहे. सोंड पाहिलेला म्हणाला, ‘मुसळासारखा’ आहे.  कान पाहिलेला म्हणाला, हत्ती सुपासारखा आहे. पाठ पाहिली होती तो म्हणाला, हत्ती भिंतीसारखा आहे. ज्याने पोट पाहिले होते तो म्हणाला, हत्ती कोथळ्यासारखा आहे. शेपूट पाहणारा म्हणाला, खराट्यासारखा आहे. अशा रीतीने ते एकमेकांस हत्तीचे वर्णन करून आपलेच म्हणणे कसे खरे आहे ते सांगत होते. अशा प्रकारे प्रत्येक जन्मांध व्यक्तीस त्याच्या त्याच्या कल्पनेनुसार हत्ती वेगवेगळा भासला. दृष्टी नसल्यामुळे त्यांना संपूर्ण हत्तीचे स्वरूपच कळले नव्हते. डोळस माणसाला मात्र जन्मांधांचा झालेला गैरसममज लक्षात आला होता. म्हणून तो जन्मांधांची चूक समजावून सांगण्यासाठी तो म्हणाला, तुम्ही जो पाहिला तो  हत्तीचा एक एक अवयव होता. सगळा हत्ती नव्हे. तुम्ही पाहिलेल्या सर्व अवयवांनी युक्त तो हत्ती होय.
अशाप्रकारे जगात ज्याला ज्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त झाले. त्या ज्ञानालाच (शक्तीला) तो  शक्तीशाली मानतो. ज्ञानी मनुष्य मात्र म्हणतो की ही परमेश्वराची एक एक शक्ती होय, संपूर्ण परमेश्वर नव्हे. अशा सर्व शक्तींनी युक्त असा तो परमेश्वर असतो. आणि तो सर्वांसाठी सर्वकाही व्यवस्था करीत असतो. परमेश्वराच्या एखाद्या अंशालाच  संपूर्ण परमेश्वर मानण्याची चूक माणूस करतो ते साधेपणाने या दृष्टांतातून दाखवून देण्यात आले आहे. माणसाच्या जीवनातील अपुरेपणा या आंधळ्यांच्या प्रतीकामधून दाखविण्याचा प्रयत्न चक्रधरस्वामींनी केला आहे.
‘हत्तीचा दृष्टांत’ या पाठातील आशय आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतो. आपण आजूबाजूला पाहिले, तर दिसेल की, अनेकांना आपली श्रद्धा हीच खरी श्रद्धा आणि आपला धर्म हाच खरा धर्म वाटतो. यामागील कारण असे की, स्वत:च्या मनातील देवाची कल्पना हीच खरी आणि देवाच्या संपूर्ण खèया स्वरूपाचे दर्शन त्या कल्पनेनेच होते, असे लोक मानतात. हे चूक आहे. वास्तविक या सगळ्या कल्पना एकत्र केल्यास देवाचे स्वरूप कळण्यास मदत होईल. मग सगळ्यांचा देव, धर्म एकच होईल. तसेच, आपल्याला झालेले ज्ञानच सत्य होय असे प्रत्येकजण मानत असतो. त्यातून मोठमोठे संघर्ष होताना दिसतात. खरे तर प्रत्येक माणसात देवाचा अंश असतोच, हेच समाज विसरून जातो. अशा वेळी समाजाने कसे वागावे, हे सांगण्यासाठी हा दृष्टांत उपयुक्त आहे.

1 comment:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024